अवघ्या 5 चेंडूंतच आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग! वाचा सविस्तर
बुधवारी (3 जून) आंतरराष्ट्रीय टी 20 महिला क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम झाला. आशियाई क्रिकेट परिषद महिला प्रीमियर कप 2026 मध्ये युनायटेड अरब अमिराती (युएई) विरुद्ध सौदी अरेबिया यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये युएईने 10 विकेट्स आणि 115 चेंडू शिल्लक राखत विजय मिळवला.
या विजयासह महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या यादीत युएई संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात सौदी अरेबियाने प्रथम फलंदाजी केली आणि ते केवळ 27 धावसंख्याच उभारू शकले. यावेळी युएईच्या तीन गोलंदाजांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या आणि अवघ्या 5 चेंडूंतच लक्ष्य गाठले.
टी20 आशिया कप पात्रता फेरीच्या सुरूवातीलाच युएईने महिला क्रिकेटमध्ये लक्षवेधी कमगिरी करत आपली छाप सोडली आहे. प्रथम फलंदाजी करताना सौदी अरेबियाने पहिल्या सहा षटकांत ३ विकेट्स गमावल्या आणि त्यानंतर 10 व्या षटकापर्यंत 4 विकेट्स गमावून 20 धावा केल्या. त्यांचे 5 खेळाडू भोपळाही न फोडला डगआऊटमध्ये परतले, यावरून असे दिसते की युएईच्या गोलंदाजीसमोर त्यांनी पूर्णपणे हार पत्करली.
युएईकडून सुरक्षा कोट्टे, हीना होटचंदानी आणि कर्णधार ईशा ओझा यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तसेच लक्ष्याचा पाठलाग करताना ईशा 5 चेंडूंत 15 धावा आणि थीर्था सतिश 4 धावा करत नाबाद राहिल्या. त्यांनी हा सामना केवळ जिंकलाच नाहीतर एक नवा विक्रमही नोंदवला. महिलांच्या टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शिल्लक राहिलेल्या चेंडूंनुसार हा चौथा सर्वात मोठा विजय होता. यापूर्वी रवांडा, टांझानिया आणि थायलंड यांनी केवळ 4 वैध चेंडू खेळत सामने जिंकले आहेत.
हा सामना जिंकल्याने युएईने +34.650 च्या नेट रनरेटसह अव्वल स्थान पटकावत स्पर्धेच्या सुरूवातीलाच आपला दावा अधिक मजबूत केला आहे.
Comments are closed.