मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, सर्वत्र हळहळ
ठाणे : राज्यातील रस्ते अपघाताच्या (Accident) घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. याउलट वेगवेगळ्या कारणास्तव रस्ते अपघाताच्या घटना घडत आहेत. गेल्याच महिन्यात मुरबाडमध्ये एका पिकअप वाहनाचा अपघात होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आता, पुन्हा एकदा कल्याण-मुरबाड-नगर (कल्याण) महामार्गावरील वरपगाव परिसरातून एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांच्या दुचाकीला अपघात होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उल्हासनगरहून पहाटेच्या सुमारास आपल्या दुचाकीने मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांचा भीषण अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. वरप येथील हनुमान मंदिराजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात या दोन्ही तरुणांची दुचाकी थेट ट्रकच्या मागच्या टायरखाली आली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये दोघेही तरुण गंभीर चिरडले गेले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राजू गुप्ता आणि पवन गुप्ता अशी मृत पावलेल्या दोन्ही तरुणांची नावे असून ते उल्हासनगरचे रहिवासी होते.
अपघाताची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात (सेंट्रल हॉस्पिटल) पाठवले आहेत. मित्राला भेटायला जातानाच दोन्ही तरुणांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळबळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर उल्हासनगरमधील त्यांच्या निवासस्थानी, परिसरात शोककळा पसरली आहे. ओव्हरटेक करताना झालेल्या या दुर्घटनेप्रकरणी टिटवाळा पोलीस आता पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.