IND Vs AFG Test Series – मोहम्मद सिराजच्या खेळण्यावर प्रश्चचिन्न; आकिब नबीचं पदार्पण होणार?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडिया शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली मुल्लनपुर येथील महाराज यदविंदर सिंह स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, या सामन्यात हिंदुस्थानचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिराजची पूर्ण फिटनेस आणि आगामी व्यस्त वेळापत्रक पाहता, त्याचा कामाचा ताण कमी करण्यासाठी संघ व्यवस्थापन त्याला विश्रांती देण्याच्या विचारात आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्ससाठी 17 सामन्यांत 19 विकेट्स घेणाऱ्या सिराजबाबतचा अंतिम निर्णय पुढील 48 तासांत स्पष्ट होईल.

दुसरीकडे, घरगुती क्रिकेटमध्ये (रणजी ट्रॉफी 2025-26) 10 सामन्यांत तब्बल 60 फलंदाज तंबुत पाठवणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीची संघात निवड न झाल्याने निवड समितीवर जोरदार टीका झाली होती. माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी तर घरगुती क्रिकेटमधील कामगिरीला महत्त्व न दिल्यास रणजी ट्रॉफी बंद करण्याचा संतप्त सल्ला दिला होता. या चौफेर टिकेनंतर बीसीसीआयने आकिब नबीचा नेट बॉलर म्हणून संघात समावेश केला आहे. मुख्य संघात अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर बरार यांसारखे गोलंदाज असताना, सराव प्रक्रियेसाठी आकिब नबी, प्रिन्स यादव, गुर्जनपीत सिंह आणि शिवांग कुमार यांच्यासह 6 नेट बॉलर्सना बोलावण्यात आले आहे.

IND Vs NZ – कसोटी, वनडे आणि टी20… हिंदुस्थानचं न्यूझीलंडविरुद्ध भरगच्च वेळापत्रक; BCCI ने केलं जाहीर

या ऐतिहासिक कसोटी सामन्यात सर्वांचे लक्ष नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल याच्यावर असणार आहे. हिंदुस्थानने 2018 मध्ये अफगाणिस्तानला अवघ्या दोन दिवसांत पराभूत केले होते, परंतु गेल्या आठ वर्षांत अफगाणिस्तानच्या खेळात मोठी सुधारणा झाली आहे. अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा शुभमन गिल एका कमकुवत मानल्या जाणाऱ्या संघाविरुद्ध कशी रणनीती आखतो आणि संघाचे नेतृत्व कसे करतो, याकडे क्रिकेट पंडितांचे बारीक लक्ष असणार आहे.

Comments are closed.