‘भाभीजी घर पर हैं’च्या निर्मात्यावरील लैंगिक छळाचे आरोप खोटे होते, अभिनेत्री शिल्पा शिंदेची कबुली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘भाभीजी घर पर हैं’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेने एक मोठी कबुली दिली आहे. कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना शिल्पाने कबुल केले आहे की, मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर तिने केलेले लैंगिक छळाचे आरोप पूर्णपणे खोटे होते. कराराच्या वादातून आणि त्यावेळच्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता, म्हणूनच आपण हे पाऊल उचलले होते, असा दावा तिने आता केला आहे. तिच्या या धक्कादायक विधानामुळे मनोरंजन विश्वात चर्चांना आहे.

शिल्पा शिंदेने 2016 मध्ये ‘भाभीजी घर पर हैं’ ही मालिका अचानक सोडली होती. त्यावेळी तिने निर्मात्यांवर मानसिक छळ, मानधन न देणे आणि सेटवर त्रास देण्याचे आरोप केले होते, जे पुढे कायदेशीर तडजोडीने मिटले होते. मात्र, आता अनेक वर्षांनंतर शिल्पाने या प्रकरणामागचे पडद्यामागचे सत्य उघड केले आहे. तिने सांगितले की, हे प्रकरण आता मिटले आहे आणि ती सत्य सांगायला अजिबात घाबरत नाही. पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्यासाठी थेट आणि गंभीर आरोप करणे आवश्यक असते, असे तिला सांगण्यात आले होते. त्यामुळेच निर्मात्याविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करावा लागला, जेणेकरून त्या चक्रातून तिची सुटका होऊ शकेल.

या कबुलीदरम्यान शिल्पाने निर्माते संजय कोहली यांची जाहीर माफी देखील मागितली. ती म्हणाली की, या खोट्या आरोपामुळे बिचाऱ्या संजय कोहली यांची खूप बदनामी झाली. आयुष्यात कधी संधी मिळाली तर हे सत्य आपण नक्कीच मान्य करू, असे तिने स्वतःशी ठरवले होते आणि आज या पॉडकास्टच्या माध्यमातून ती हे पहिल्यांदाच उघडपणे मान्य करत आहे. या प्रकरणाच्या तडजोडीनंतर तिचे तीन महिन्यांचे अडकलेले मानधन तिला परत मिळाले होते. त्या काळात ती अत्यंत मानसिक तणावातून जात होती आणि एका वर्षानंतर असा खटला दाखल करणे तिच्यासाठी कठीण होते. मात्र, परिस्थितीने तिला हतबल केले होते, असे तिने स्पष्ट केले.

2016 मधील शिल्पाच्या या एक्झिटमुळे टीव्ही जगतात मोठा वाद निर्माण झाला होता. निर्मात्यांनी तिच्यावर व्यावसायिक शिस्त न पाळल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस पाठवली होती आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली होती. त्यातच सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने (CINTAA) तिच्यावर काम करण्याबाबत बंदी घातल्याचा दावा शिल्पाने केला आहे. याच सर्व चौफेर कोंडीतून मार्ग काढण्यासाठी तिने 2017 मध्ये निर्मात्यांविरोधात ही खोटी तक्रार दाखल केली होती, ज्याचे सत्य आता नऊ वर्षांनंतर समोर आले आहे.

Comments are closed.