Ahilyanagar News – श्रीरामपूरमध्ये एटीएसचे धाडसत्र; पाकिस्तानी गँगस्टरशी संपर्काच्या संशयावरून चौघे ताब्यात
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि स्थानिक पोलिसांनी बुधवारी सकाळी संयुक्त कारवाई करत सात ते आठ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. दरम्यान या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांनी कारवाई झाली असल्याचे स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीरामपूरमधील काही व्यक्ती पाकिस्तानस्थित गँगस्टर भाटी आणि राणा यांच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने श्रीरामपूर शहरातील विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. छाप्यांदरम्यान काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे व अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे, मागील आठवड्यात श्रीरामपूरमध्ये एका संशयास्पद व्हिडिओची मोठी चर्चा झाली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील एका व्यक्तीकडून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही युवकांशी संपर्क साधला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी या व्हिडिओची पडताळणी केली असता संबंधित व्यक्ती पाकिस्तानातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानंतर श्रीरामपूर पोलिसांनी याबाबतची माहिती तत्काळ एटीएसकडे पाठविली होती.
या माहितीच्या आधारे एटीएसचे पथक बुधवारी सकाळी श्रीरामपूरमध्ये दाखल झाले आणि शहरातील सात ते आठ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या मोबाईल फोन, सोशल मीडिया व्यवहार, संपर्क तसेच आर्थिक देवाणघेवाणीची माहिती तपासली जात आहे. तसेच पाकिस्तानातून मिळालेल्या सूचनांच्या आधारे काही व्यक्तींच्या घरांची रेकी करण्यात आल्याची माहितीही तपास यंत्रणांना मिळाली असून त्या दृष्टीनेही चौकशी सुरू आहे.
दरम्यान, या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई सुरू असल्याची पुष्टी केली. “संशयास्पद व्हिडिओ आणि सोशल मीडिया संपर्काची माहिती मिळाल्यानंतर ती एटीएसकडे देण्यात आली होती. त्यानुसार आज संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओ कोणी पाठविला, त्यामागे कोणाचा सहभाग आहे, संपर्काचे स्वरूप काय आहे आणि यामागील नेमके कारण काय आहे, याचा सर्वंकष तपास सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.
सध्या एटीएस आणि स्थानिक पोलीस विविध अंगांनी तपास करत असून चौकशीनंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. त्यामुळे श्रीरामपूरसह संपूर्ण जिल्ह्यात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
Comments are closed.