आपला आवाज उठवण्यासाठी, हक्क ठसवण्यासाठी सज्ज व्हा! सीजेपीच्या आंदोलनाआधी अतुल कुलकर्णींचे तरुणांना आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोशल मीडियावर सध्या कमालीची चर्चा असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके हे उद्या, शनिवारी 6 जून रोजी अमेरिकेतून हिंदुस्थानात परतणार आहेत. ते दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या या आगमनामुळे अनेकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक विशेष पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. ‘तरुणांनो उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे,’ असे म्हणत त्यांनी तरुण पिढीला एक महत्त्वाचा आणि भावनिक संदेश दिला आहे.

अतुल कुलकर्णी यांनी तरुण नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये आधीच्या पिढ्यांकडून झालेल्या चुकांची प्रामाणिक कबुली दिली आहे. माझ्या पिढीने आणि त्याआधीच्या व नंतरच्या पिढ्यांनीही आपापल्या जबाबदाऱ्या नेहमीच पूर्णपणे पार पाडल्या असे नाही, असे सांगत त्यांनी निर्माण झालेल्या मोठ्या आव्हानांबद्दल तरुण पिढीची क्षमा मागितली आहे. हा आव्हानांचा वारसा आता नव्या पिढीला मिळाला असून, त्यांनी आपला आवाज उठवण्यासाठी आणि हक्क ठसवण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ हा या देशाचा प्राण असल्याचे नमूद करत, तरुण पिढी सचोटीने आणि सर्वांबद्दल करुणा बाळगून या देशाला व समाजाला एक नवा आकार देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अभिजित दीपके यांच्या हिंदुस्थानातील पुनरागमनाच्या पार्श्वभूमीवर तरुणांना प्रेरित करणारी अतुल कुलकर्णी यांची ही सदिच्छा पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके हे 6 जून 2026 पासून दिल्लीतील जंतर मंतर येथे होणाऱ्या धरणे आंदोलनाचे वैयक्तिकरित्या नेतृत्व करण्यासाठी अमेरिकेतून परत येत आहेत. या आंदोलनाला हवामान कार्यकर्त्या सोनम वांगचुक आणि अभिनेते प्रकाश राज यांसारख्या प्रमुख व्यक्तींचाही पाठिंबा आहे, ज्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे किंवा यात सामील होण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Comments are closed.