मोहुर्ली ग्रामपंचायत कार्यालयाला संतप्त ग्रामस्थांनी ठोकले कुलूप; कारभारात पारदर्शकता नसल्याचा केला आरोप
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील मोहुर्ली ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना घडली. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहूर्ली ग्रामपंचायतीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. सभेदरम्यान प्रशासकीय सदस्यांनी गावातील विकासकामे, विविध योजनांवरील खर्च तसेच इतर प्रशासकीय कामकाजाची माहिती सरपंच व सचिवांकडे मागितली. मात्र संबंधितांकडून समाधानकारक माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध नोंदविला. या घटनेनंतर गावातील वातावरण तापले असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सचिवांच्या तक्रारीवरून एका पुरुषासह दोन महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे गावात नव्या वादाला तोंड फुटले असून ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
Comments are closed.