Ratnagiri News – आंजर्ले ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय; एकेरी वापराच्या प्लास्टिकवर संपूर्ण बंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आंजर्ले ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायतीच्या निर्णयानुसार आजपासून गावाच्या हद्दीत एकेरी वापराच्या (Single Use) प्लास्टिकवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आली असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता ग्रामपंचायतीने जनसहभागालाही प्रोत्साहन दिले आहे.

गावात कोणीही व्यक्ती एकेरी वापराचे प्लास्टिक वापरत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास आकारण्यात आलेल्या दंडातील २५० रुपये माहिती देणाऱ्यास बक्षीस म्हणून दिले जाणार असून उर्वरित २५० रुपये ग्रामपंचायत निधीत जमा केले जाणार आहेत. प्लास्टिकवर संपूर्ण बंदी करणारे गाव म्हणून दापोली तालुक्यातील आंजर्ले एक पहीले गाव ठरले आहे.

हा महत्त्वपूर्ण निर्णय गावच्या सरपंच मेघना पवार आणि सर्व सदस्यांनी मिळून घेतला आहे. गावातील जबाबदार नागरिक राजेश जैन आणि मकरंद म्हादळेकर यांनी या विषयाचे गांभीर्य तसेच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत उचललेली कठोर पावले याविषयी ग्रामस्थांना अवगत केले. त्यानुसार आंजर्ले गावाने एकमुखाने हा निर्णय घेतला आहे.

प्लास्टिक प्रदूषण ही आजच्या काळातील सर्वांत गंभीर पर्यावरणीय समस्या बनली आहे. आंजर्ले हे दापोली तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. समुद्रकिनारी वसलेल्या या गावासाठी ही समस्या अधिक चिंतेची ठरत होती. प्लास्टिकमुळे समुद्री जैवविविधता, किनारपट्टी आणि नैसर्गिक पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

ग्रामस्थ, व्यापारी आणि पर्यटकांनीही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण दिनी घेतलेला हा निर्णय केवळ आंजर्लेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यासाठी आदर्श ठरणारा आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्र आल्यास बदल शक्य असल्याचा संदेश आंजर्ले ग्रामपंचायतीने आपल्या कृतीतून दिला आहे.

Comments are closed.