ऋषभ पंतचे कसोटी उपकर्णधारपद का काढले? गंभीरचे स्पष्टीकरण देताना वॉर्निंगही; म्हणाले, “त्याला बदलण्याची…”

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्याला शनिवारी (६ जून) सुरूवात होणार आहे. मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. यावेळी त्यांनी ऋषभ पंतचे उपकर्णधारपद का काढून घेतले आणि त्याच्या फलंदाजी शैलीबाबत वक्तव्य केले आहे.

पंतला उपकर्णधारावरून हटवण्याबाबत गंभीर म्हणाले की, फलंदाजाला त्याचा पाठिंबा आहे, मात्र त्याला खेळाची परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज आहे. “आम्हाला ऋषभ पंतची खेळण्याची शैली बदलायची नाही, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंनी सामन्याच्या परिस्थितीचा आदर करणे महत्त्वाचे आहे,” असे गंभीर म्हणाले आहेत.

“मग कसोटी क्रिकेट असो वा वनडे किंवा टी२० क्रिकेट असो, धावा कऱणे आणि विकेट्स घेणे हेच अंतिम ध्येय असते. तुम्ही धावा कशा करता हे तुमच्यावर अवलंबून आहे, मात्र परिस्थिती आणि खेळ समजून घेणे महत्त्वाचे आहे,” असेही गंभीर पुढे म्हणाले.

“भारतासाठी खेळणे हीच एकमेव जबाबदारी आहे. कर्णधारपद, उपकर्णधारपद किंवा इतर कोणतेही पद केवळ त्याचेच परिणाम आहेत. जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता, तेव्हा तुम्ही पहिल्या दिवसापासून या गोष्टींचा विचार करत नाही. तुमचे लक्ष केवळ भारतासाठी चांगली कामगिरी करण्यावर असते. यामुळे एका पदावरून दुसऱ्या पदावर जाणे हा केवळ समीकरणाचा एक भाग आहे. शेवटी प्रत्येकाचे मुल्यूमापन कामगिरीवरच केले जाते,” असे गंभीर यांनी पत्रकारांना सांगितले.

शनिवारी पंत आपल्या कारकिर्दीतील ५० कसोटी सामना खेळणार आहे. त्याने ४९ कसोटी सामन्यांमध्ये ४२.९१ च्या सरासरीने ३४७६ धावा केल्या आहेत. यामध्ये ८ शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे. अफगाणिस्तान विरुद्ध पंत विकेटकीपर-फलंदाज म्हणून खेळणार आहे. यासाठी शुबमन गिल कर्णधार तर केएल राहुलची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

Comments are closed.