आता शुभमनची ‘गंभीर’ कसोटी, अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव सामना आजपासून
आयपीएलच्या धमाकेदार हंगामानंतर हिंदुस्थानचा क्रिकेट संघ आता नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये एकमेव कसोटी सामना शनिवारी सुरू होणार आहे. हिंदुस्थानचा संघ बऱ्याच दिवसांनी कसोटी क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे त्यांची खरी कसोटी या सामन्यात लागेल.
गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या निराशाजनक कसोटी मालिका पराभवाच्या कडू आठवणी मागे सारून हिंदुस्थानचा संघ कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. मानव सुतार, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार हे नवे चेहरे हिंदुस्थानच्या कसोटी संघाचा भाग आहेत. पण नक्की कोणाला संधी याची प्रतीक्षा क्रिकेटप्रेमींना लागली आहे.
हिंदुस्थानचा संभाव्य संघ ः के. एल. राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, हर्ष दुबे/मानव सुतार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.
साईची तिसऱ्या क्रमांकावर वर्णी?
हिंदुस्थानच्या तिसऱया क्रमांकाचा पेच अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे यावेळी कोणता खेळाडू या स्थानावर खेळणार याबाबत गौतम गंभीर म्हणाले की, ‘साई सुदर्शनला योग्य संधी मिळालेली नाही. त्याने त्याचे बहुतेक सामने इंग्लंडमध्ये खेळले आहेत. तो योग्य संधीस पात्र आहे. साई सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून, आयपीएलमध्ये त्याने 700 हून अधिक धावा केल्या आहेत. आपण साईचे चार-पाच सामन्यांच्या आधारावर मूल्यांकन करू शकत नाही. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला योग्य संधी मिळू शकते.’
मानव आणि हर्षपैकी कोणाला संधी
या सामन्यासाठी डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून मानव सुथार आणि हर्ष दुबे यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. ऑगस्टमध्ये श्रीलंकेत होणाऱया दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानला फिरकी गोलंदाजीचे अधिक पर्याय तयार ठेवावे लागतील. त्यामुळे या सामन्यात त्यांना संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे.
पंतने परिस्थिती समजण्याची गरज
ऋषभ पंतला कसोटी उपकर्णधारपदावरून हटवण्याचा संदर्भ देत गंभीर म्हणाले की, ‘ऋषभला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. पण त्याला सामन्याची परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज आहे. आम्हाला ऋषभची खेळण्याची शैली बदलायची नाही, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंनी सामन्याच्या परिस्थितीचा आदर करणे महत्त्वाचे आहे.’
Comments are closed.