गंभीर खनिज पुरवठा साखळी वेधशाळेचे उद्घाटन

भारत-ब्रिटनदरम्यान रणनीतिक भागीदारी अंतर्गत महत्त्वाचे यश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि ब्रिटनदरम्यान दुर्मीळ खनिजांच्या क्षेत्रात रणनीतिक भागीदारीने आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी मागील वर्षी दुर्मीळ खनिज पुरवठासाखळी वेधशाळा (क्रिटिकल मिनरल्स सप्लाय चेन ऑब्जर्वेटरी सेंटर) स्थापन करण्याची घोषणा केली होती. आता या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डीआणि ब्रिटनच्या विदेशमंत्री यवेटे कूपर यांनी संयुक्त स्वरुपात भारत-ब्रिटन क्रिटिकल मिनरल्स ग्लोबल सप्लाय चेन ऑब्जर्वेटरी (जीएससीओ) सॅटेलाइट सेंटरचे उद्घाटन केले आहे.

दुर्मीळ खनिज आणि पुरवठासाखळी मजबूत करण्याकरता आमच्या वाढत्या भागीदारीतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे भारताने म्हटले आहे. भारत आणि ब्रिटनने ‘रिजनल मेरीटाइम सिक्युरिटी सेंटर ऑफ अॅक्सिलेंस’ स्थापन करण्यासाठी एका सामंजस्य करारावरही स्वाक्षरी केली आहे. हे केंद्र हिंदी महासागरातील देशांना बिगर-पारंपरिक सागरी सुरक्षा धोक्यांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करण्यास मदत करणार आहे.

ही वेधशाळा जगभरात दुर्मीळ खनिजांची सुरक्षित, शाश्वत आणि विश्वसनीय पुरवठासाखळी विकसित करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. स्वच्छ ऊर्जा, प्रगत तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तनाच्या वेगाने विस्तारासोबत दुर्मीळ खनिजे जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा ठरत आहेत. ही वेधशाळा जगातील सर्वात मोठ्या डिजिटल मटेरियल फ्लो मॅपचे प्रमुख केंद्र ठरेल असा दावा केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी केला आहे.

जयशंकर यांच्यासोबत चर्चा

कूपर यांनी विदेशमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली आहे. यावेळी व्यापार, तंत्रज्ञान, पुरवठासाखळी, संरक्षण, हवामान, शिक्षण आणि लोकांमधील परस्पर संबंधांवर केंद्रीत द्विपक्षीय सहकार्यात होत असलेल्या प्रगतीची समीक्षा करण्यात आली आहे. दोन्ही देश स्वत:च्या नव्या आणि व्यापक व्यापार करार तसेच संरक्षण औद्योगिक रोडमॅपच्या आधारावर भविष्यासाठी एक नवी आणि परस्पर लाभदायक भागीदारी निर्माण करण्याच्या चांगल्या स्थितीत असल्याचे जयशंकर यांनी बैठकीत म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींची भेट

ब्रिटनच्या विदेशमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची देखील भेट घेतली आहे. अलिकडच्या काळात भारत-ब्रिटन भागीदारी आणखी दृढ होत असल्याने दोन्ही देशांच्या विकासासाठी अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत. भारत-ब्रिटन व्हिजन 2035 आमच्या भागीदारीला मार्गदर्शन करत राहिल आणि जागतिक कल्याणासाठी आमच्या संयुक्त प्रयत्नांना मजबूत करेल असे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत.

Comments are closed.