IND vs AFG: कॅप्टन गिलने कसोटी कर्णधार म्हणून फक्त इतक्या दिवसांत पूर्ण केल्या हजार धावा! गांगुली-धोनीलाही टाकलं मागे
न्यू चंदीगडमधील मुल्लांपुर स्टेडियमवर 6 जूनपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामना सुरू झाला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात 368 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार शुबमन गिल (Captain Gill) 103 धावांवर नाबाद होता. या खेळीसह गिलने दोन मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. तो आता कर्णधार म्हणून कसोटीत सर्वात कमी दिवसांत 1000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला असून, कर्णधार म्हणून त्याने आपले सहावे शतकही पूर्ण केले आहे.
शुबमन गिलबद्दल सांगायचे तर, कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात कमी डावांत 1000 धावा पूर्ण करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने हा टप्पा केवळ 15 डावांत गाठला. या यादीत सुनील गावस्कर पहिल्या क्रमांकावर आहेत, ज्यांनी 14 डावांत कर्णधार म्हणून कसोटीत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र, कर्णधार असताना सर्वात कमी दिवसांत 1000 कसोटी धावा पूर्ण करण्याचा विक्रम आता गिलच्या नावावर आहे, त्याने अवघ्या 351 दिवसांत हा पराक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत शुबमन गिल आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. सहावे शतक झळकावून त्याने एमएस धोनी, सौरव गांगुली आणि नवाब पतौडी यांना मागे टाकले आहे, ज्यांच्या नावावर कर्णधार म्हणून प्रत्येकी 5 कसोटी शतके आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे भारतीय कर्णधार
विराट कोहली – 20 शतके
सुनील गावस्कर – 11 शतके
मोहम्मद अझरुद्दीन – ९ शतके
सचिन तेंडुलकर – 7 शतके
शुबमन गिल – 6 शतके
Comments are closed.