VIDEO: वैभव सूर्यवंशीची गर्जना! म्हणाला, “मला केवळ खेळायचं नाही तर 20 वर्षे वर्चस्व….”
आयपीएल २०२६ मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याची अखेर भारतीय संघासाठी निवड झाली. त्याने आयपीएलच्या १९ व्या हंगामात जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे त्याला राष्ट्रीय वरिष्ठ संघात घेतले पाहिजे, या चर्चेला जोर धरला होता. अखेर जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी (६ जून) आशियाई क्रीडा स्पर्धा, आयर्लंड- इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी२० संघाची घोषणा केली तेव्हा संघात वैभवचा समावेश करण्यात आला. आता त्याबद्दल वैभवचा एक व्हिडिओ आरआरने पोस्ट केला असून त्यामध्ये त्याने केवळ खेळायला नाही, वर्चस्व गाजवायला आलो आहे, असे वक्तव्य केले आहे.
आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यानंतर वैभवने आरआरचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांना मुलाखत दिली. यामध्ये त्याने म्हटले की, तिन्ही प्रकारामध्ये खेळणे माझे स्वप्न आहे. मला अशाप्रकारे खेळायचे आहे की मी केवळ खेळणार नाही तर १० ते २० वर्षे वर्चस्व गाजवीन. यावेळी त्याने विराट कोहलीला भेटलेल्या क्षणाचाही उल्लेख केला आहे.
वैभव विराटची भेट झालेल्याबद्दल म्हणाला, “मी आधीपासूनच आरसीबीचा चाहता आहे; खरं तर, मी विराट भैयाचा खूप मोठा चाहता आहे. जेव्हा त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून माझ्याशी संवाद साधला, तेव्हा ते एखाद्या स्वप्नासारखे वाटले. त्याने ज्या प्रकारे माझ्याशी बोलणे केले, त्यावरून मला असे अजिबात वाटले नाही की मी ‘विराट कोहली’ या सुपरस्टारशी बोलत आहे. त्याने एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे माझ्याशी संवाद साधला. त्याने मला ज्या गोष्टी समजावून सांगितल्या, मी काय चांगले करत होतो, कुठे सुधारणेची गरज आहे, कशावर लक्ष केंद्रित करायला हवे आणि भविष्यात काय करायला हवे त्या सर्व गोष्टी खरोखरच खूप खास होत्या.”
वैभवला कसोटी क्रिकेटबद्दल विचारले असता तो म्हणाला मला लाल चेंडूने खेळायचे आहे. मला लाल चेंडूने खेळायला खूप आवडते. तिन्ही प्रकारामध्ये खेळणे माझे स्वप्न आहे. मला अशाप्रकारे खेळायचे आहे की मी केवळ खेळणार नाही तर १० ते २० वर्षे वर्चस्व गाजवीन.
वैभव आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. तसेच तो प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन हे पुरस्कार जिंकले. तसेच त्याने आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा इतिहासही रचला.
Comments are closed.