ना एक धाव कमी, ना जास्त! केएल राहुलचा ‘परफेक्ट 100’वर गेम ओव्हर, अजब विक्रमाची नोंद
अफगाणिस्तानविरुद्ध न्यू चंदिगड येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने खणखणीत शतक झळकावले. राहुलने 165 चेंडूंचा सामना करत 100 धावा केल्या. या खेळी दरम्यान त्याने 11 चौकार ठोकले. त्यानंतर शुभणन गिलने 126, ऋषभ पंतने 81, वॉशिंग्टन सुंदरने 52 धावा चोपत संघाला 500 पार पोहोचवले. दुसर्या दिवशी हिंदुस्थानने 8 बाद 564 धावांवर घोषित केला. दरम्यान, राहुलने शतकी खेळीसह एका अजब विक्रमाची नोंद केली आहे.
राहुलने 164 चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घातली. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे बारावे शतक आहे. झियाउर रहमान शरीफीच्या चेंडूवर दोन धावा घेत त्याने तीन अंकी धावसंख्या गाठली. शतक पूर्ण होताच राहुलने हेल्मेट काढून प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले आणि ड्रेसिंग रूममधील सहकाऱ्यांनीही टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक केले. परंतु, हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. पुढच्याच चेंडूवर राहुलने एक कडक कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूने बॅटची कड घेतली आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रहमानुल्लाह गुरबाजने हवेत सूर मारत एक अद्भूत झेल टिपला.
क्रिकेटच्या भाषेत याला ‘हंड्रेड अँड आऊट’ म्हटले जाते. राहुलने या खेळीसह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही न झालेला विक्रम केला आहे. केएल राहुल हा सलग तीन कसोटी शतकांवेळी 100 वर बाद होणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली त्यांच्या कसोटी कारकिर्दीत दोन-दोन वेळा 100 धावांवर बाद झाले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ आणि इंग्लंडचे लेन हटन यांसारखे दिग्गजही तीन-तीन वेळा 100 वर बाद झाले आहेत. पण सलग तीन वेळा परफेक्त 100 धावांवर बाद होणारा राहुल हा एकमेव फलंदाज ठरला आहे.
📸📸 मधील 12 व्या कसोटीचे शंभर क्षण
पासून एक अपवादात्मक शतक #TeamIndia न्यू चंदीगडमध्ये उपकर्णधार! 💯
अपडेट्स ▶️ https://t.co/Au50EfVM30 #INDvAFG | @klrahul | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/N2EmdIDiyO
— BCCI (@BCCI) 6 जून 2026
टी-20 मधून कसोटीत येणे सोपे नव्हते!
आयपीएल संपल्यानंतर इतक्या कमी वेळेत टी-20 मोडमधून कसोटी क्रिकेटच्या मानसिकतेत स्वतःला बदलणे हे मोठे आव्हान होते. येथील खेळपट्टी संथ होती आणि परिस्थिती आव्हानात्मक होती. मात्र, सरावादरम्यान केलेल्या तयारीचा मला फायदा झाला. मी प्रदीर्घ काळ फलंदाजी करू शकलो आणि संघासाठी योगदान दिले, याचा आनंद आहे, असे केएल राहुल शतकी खेळीनंतर म्हणाला.
Comments are closed.