पुरातत्व डायरी- अजरामर साक्षीदार

<<प्रा. आशुतोष पाटील>>

[email protected]

महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृतीच्या जडणघडणीचा महत्त्वाचा टप्पा अधोरेखित करण्यात दायमाबाद उत्खनन महत्त्वपूर्ण ठरते. म्हणूनच नवे पैलू उजेडात आणण्यासाठी या स्थळाचा अधिक सखोल अभ्यास झाला पाहिजे.

दायमाबादच्या विकासाचा चौथा टप्पा म्हणजे माळवा संस्कृती, ज्या काळात या वस्तीचा आकार आणि सामाजिक रचना कमालीची वाढली. डॉ. साळी यांच्या उत्खननातून या काळातील एक अत्यंत संघटित औद्योगिक आणि निवासी परिसर उघडकीस आला. यामध्ये तांबटाचा (coppersmith) कारखाना, दगडकाम कापणाऱया कारागिराचे कार्यक्षेत्र आणि इतर कुशल कारागिरांची घरे सापडली. यावरून दिसून येते की, येथील व्यापार अर्थव्यवस्था कमालीची भरभराटीस आली होती आणि समाज विविध श्रेणींमध्ये विभागला गेला होता. माळवा संस्कृतीमुळे दायमाबाद हे मध्य आणि पश्चिम भारताला जोडणारे एक मोठे प्रादेशिक व्यापार केंद्र बनले. या संपूर्ण साखळीतील पाचवा आणि अंतिम टप्पा म्हणजे जोर्वे संस्कृती, जो दायमाबादमधील नागरीकरणाचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात वस्तीचा विस्तार आणि लोकसंख्या सर्वाधिक होती. येथील नगररचना अत्यंत प्रगत होती, ज्यामध्ये रस्ते, गल्ल्या आणि संरक्षणासाठी एक मोठी मातीची तटबंदी आणि बंधारा बांधण्यात आला होता. भडक लाल रंगाची आणि त्यावर भौमितिक व नैसर्गिक चित्रे असलेली जोर्वे संस्कृतीची भांडी या काळाची ओळख आहेत.

स्तररचनेव्यतिरिक्त, दायमाबादच्या उत्खननाने या प्राचीन समाजांच्या तांत्रिक आणि औद्योगिक क्षमतेवर मोठा प्रकाश टाकला आहे. दगडी ब्लेड्स (lithic blade) बनवण्याचा उद्योग सावळदापासून जोर्वे टप्प्यापर्यंत सतत विकसित होत गेला, ज्यातील सूक्ष्म बदल तांत्रिक प्रगती दर्शवतात. या तांत्रिक प्रगतीसोबतच डॉ. साळी यांच्या अहवालात दायमाबादमधील दफन पद्धतींचे (mortuary practices) अत्यंत सविस्तर वर्णन केले आहे, जे या लोकांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक विश्वाचा उलगडा करते. उत्खननात सापडलेल्या अनेक थडग्यांचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी प्रामुख्याने ‘कुंभ-दफन’ (urn burial) पद्धतीचा वापर केला जात असे, जिथे मृतदेह मातीच्या मोठय़ा माठात ठेवून ते माठ घराच्या खालीच पुरले जात. यावरून असे दिसते की, पूर्वजांचे आत्मे घरातच राहून कुटुंबाचे रक्षण करतात, अशी त्यांची श्रद्धा असावी. याउलट प्रौढांना सहसा उताणे पुरले जाई आणि परलोकातील प्रवासासाठी त्यांच्यासोबत अन्नाने भरलेली मातीची भांडी ठेवली जात. थडग्यांची रचना, त्यांची दिशा आणि सोबत ठेवलेल्या वस्तूंच्या विविधतेवरून दायमाबादमध्ये श्रीमंत आणि सामान्य असे सामाजिक स्तर निर्माण झाले होते, यावर शिक्कामोर्तब होते.

दायमाबाद येथे झालेल्या उत्खननातून अनेक सांस्कृतिक स्तर प्रकाशात आले असून त्यांची सविस्तर चर्चा यापूर्वी करण्यात आलेली आहे. मात्र या स्तरांमधून प्राप्त झालेल्या पुरावशेषांचे महत्त्व स्वतंत्रपणे अधोरेखित करावे लागते. दायमाबादमधील प्रसिद्ध कांस्य शिल्पसंचाने या स्थळाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली असली तरी त्याव्यतिरिक्त सापडलेल्या असंख्य वस्तूंनी या वस्तीचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवन उलगडून दाखवले आहे.

या काळात केवळ दगडांचा हत्यार म्हणूनच वापर झाला असे नाही, तर काही अर्ध मौल्यवान दगडाचे मणीदेखील तयार केलेले आढळले. या उत्खननात एकूण 754 मण्यांचा शोध लागला असून त्यांचे आकार, रूप आणि बनावट यांमध्ये लक्षणीय वैविध्य आढळते. या मण्यांमधून त्या काळातील अलंकारनिर्मिती, सौंदर्यदृष्टी आणि व्यापारसंबंध यांचा अंदाज येतो. याशिवाय शंखांपासून बनवलेल्या काही वस्तूदेखील सापडल्या आहेत. दगडी वस्तूंमध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो अगेट आणि बेसाल्ट दगडांपासून तयार केलेल्या दोन ऊर्ध्वलिंग (Ithyphallic) शिल्पांचा. ही शिल्पे एका घराच्या अवशेषांमध्ये सापडली होती. त्यांच्या स्वरूपावरून ती संतती, प्रजननशक्ती किंवा भरभराटीच्या संकल्पनांशी संबंधित असावीत असा तर्क संशोधकांनी मांडला आहे.

दायमाबादच्या विविध स्तरांमधून मृण्मय वस्तूंचाही मोठा संग्रह प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे सर्वात खालच्या पहिल्या स्तरातून एकही मृण्मय वस्तू मिळालेली नाही, तर पाचव्या स्तरात अशा वस्तूंची संख्या सर्वाधिक आहे. या वस्तूंमध्ये प्राण्यांची शिल्पे, चाके, मातृदेवतांच्या प्रतिमा तसेच विविध आकारांच्या उपयुक्त आणि सजावटी वस्तूंचा समावेश होतो. स्त्राr आकृतींच्या मृण्मय प्रतिमांना संशोधकांनी ‘मातृदेवता’ असे संबोधले आहे. मात्र या प्रतिमांचा संबंधही संतती, प्रजनन आणि समृद्धीच्या संकल्पनांशी असावा असे दिसते. अशाच प्रकारच्या मातृदेवतांच्या प्रतिमा इनामगावच्या उत्खननातही सापडल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तू पाचव्या स्तरातून प्राप्त झालेल्या आहेत, ज्यावरून त्या काळातील सांस्कृतिक विकासाची उंची लक्षात येते. दायमाबादमध्ये सापडलेल्या काही मृद्भांडांवर मानवी आकृत्यांचे चित्रण आढळते. या भांडय़ांचे स्वरूप आणि सजावट इनामगाव येथे सापडलेल्या भांडय़ांशी साधर्म्य दर्शविते. काही मातीच्या तुकडय़ांवर सिंधू लिपीतील चिन्हे कोरलेली आढळली आहेत, तर काही भांडी रंगवलेलीही आहेत. या सर्व पुराव्यांवरून दायमाबादची वस्ती उत्तर हडप्पा परंपरेशी संबंधित असल्याचे स्पष्ट होते. किंबहुना हा त्या संबंधाचा सर्वात महत्त्वाचा पुरातत्त्वीय पुरावा मानला जाऊ शकतो. या काळात धातूचा वापर सुरू झालेला होता, हे कांस्य शिल्पांवरून स्पष्ट होतेच, परंतु त्याव्यतिरिक्त धातूच्या बांगडय़ा, पट्टय़ा आणि इतर वस्तूही उत्खननात सापडल्या आहेत. तांत्रिक प्रगती, हस्तकौशल्य आणि सामाजिक परिवर्तन यांचे हे महत्त्वाचे द्योतक आहे.

1976 ते 1979 दरम्यान दायमाबाद येथे झालेल्या ऐतिहासिक उत्खननाने केवळ प्राचीन वास्तू उजेडात आणल्या नाहीत, तर जवळपास हजार वर्षे दख्खनमध्ये बहरलेल्या एका जिवंत आणि प्रगत समाजाची पुनर्रचना केली. डॉ. एस. ए. साळी यांचे अचूक आणि प्रामाणिक दस्तऐवजीकरण दख्खनच्या आद्यइतिहासाला समजून घेण्यासाठी आज एक पायाभूत संदर्भ प्रदान करते. उत्तर-हडप्पा संस्कृतीच्या प्रगत नागरी परंपरा कशा प्रकारे दक्षिणेकडे सरकल्या आणि त्यांनी स्थानिक संस्कृतींशी मेळ घालून माळवा आणि जोर्वेसारख्या नवीन, प्रगत संस्कृतींना जन्म दिला, या ऐतिहासिक प्रवासातील दायमाबाद हा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. परंतु एवढा वैभवशाली इतिहास असलेले हे स्थळ आपल्यामागे एक मोठे गूढही सोडून जाते. इसवी सन पूर्व 1000 च्या सुमारास हे गजबजलेले, तटबंदी असलेले महानगर-जिथे तांबट, मणी बनवणारे आणि प्रगत सामाजिक व्यवस्था नांदत होती, अचानक ओसाड झाले. याचे कारण कदाचित हवामान बदलामुळे आलेला तीव्र दुष्काळ असावा, स्थानिक संसाधनांचा झालेला ऱहास असावा किंवा लोखंडाचा वापर करणाऱया नवीन लोकांचे आगमन असावे. कारण काहीही असले तरी दायमाबादच्या रूपाने ताम्रपाषाण युगाचा हा सोनेरी अध्याय कायमचा बंद झाला. आज एएसआयच्या अहवालाच्या पानांमधून दायमाबाद हे मानवी संस्कृतीची लवचिकता, कल्पकता आणि काळाच्या ओघात होणाऱया तिच्या विनाशाचे एक मूक पण अजरामर साक्षीदार म्हणून उभे आहे.

दायमाबाद येथे झालेल्या उत्खननाचा 750 पानांचा सविस्तर रिपोर्ट हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारा 1986 साली प्रकाशित करण्यात आला होता. दायमाबादमधील हे सर्व पुरावे महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृतीच्या जडणघडणीचा एक महत्त्वाचा टप्पा अधोरेखित करतात. त्यामुळे दायमाबादसारख्या स्थळांचा अधिक सखोल अभ्यास केल्यास महाराष्ट्राच्या प्रागैतिहासिक आणि आद्यऐतिहासिक विकासाबाबत अनेक नवे पैलू पुढे येण्याची शक्यता आहे.

(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

Comments are closed.