INDvsAFG: कॅप्टन शुबमन गिलचा डॉन ब्रॅडमन यांच्या 'या' खास यादीत एंट्री! स्टीव्ह स्मिथ चौथ्या स्थानावर
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात मुल्लानपूरमध्ये (न्यू चंदीगड) एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. यामध्ये भारताचा कर्णधार शुबमन गिल याने शनिवारी (६ जून) शतकी खेळी केली आहे. त्याने १५ चौकार आणि एक षटकाराच्या साहाय्याने १२६ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या खास यादीत प्रवेश केला आहे.
गिलने या खेळीदरम्यान कसोटीमध्ये कर्णधार म्हणून १००० धावांचा टप्पा गाठला. त्याच्या या धावा ८२.८ सरासरीने आल्या. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १००० धावा सर्वोच्च सरासरी गाठून तो ब्रॅडमन यांच्या यादीत सामील झाला आहे. कसोटीमध्ये कर्णधार म्हणून सर्वोच्च सरासरीने १००० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत, ७५ पेक्षा अधिक सरासरी असलेले ब्रॅडमन आणि गिल केवळ हे दोनच खेळाडू आहेत. ब्रॅडमन यांची सरासरी १०१.५ राहिली आहे.
कर्णधार म्हणून १००० धावांचा टप्पा गाठताना सर्वोच्च सरासरी असलेल्या पहिल्या पाच कर्णधारांच्या यादीत कुमार संगकारा तिसऱ्या, स्टीव्ह स्मिथ चौथ्या आणि माहेला जयवर्धेने पाचव्या स्थानावर आहेत.
कर्णधार म्हणून १००० धावांचा टप्पा गाठताना सर्वोच्च सरासरी असलेले खेळाडू
डॉन ब्रॅडमन – १०१.५
शुभमन गिल – ८२.८
कुमार संगकारा – ६९.६
स्टीव्ह स्मिथ – ६८.१
माहेला जयवर्धने – ५९.१
भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याची स्थिती
भारत २०१८ नंतर अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. केएल राहुल आणि गिल यांनी शतके, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे भारताचा पहिला डाव ८ विकेट्स ५६४ धावसंख्येवर घोषित झाला. राहुल १०० धावा करत लगेच बाद झाला, तर गिल आणि पंत यांनी भारतासाठी या डावातील सर्वाधिक भागीदारी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६९ धावांची भागीदारी केली. गिल १२६ धावा आणि पंत ८१ धावा करत बाद झाले. सुदर्शननेही ८१ धावा केल्या.
अफगाणिस्तानचा डाव सुरू असून भारताकडून पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने संघाल चांगली सुरूवात करून दिली. त्याने २ विकेट्स घेतल्या असून प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव ८८ धावांवर ३ विकेट्स असा आहे.
Comments are closed.