आखातातील युद्धाची क्रीडा क्षेत्राला झळ; इराकच्या स्टार फुटबॉलपटूला अमेरिकन विमानतळावर 7 तास रोखून धरलं
आखातामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाची झळ आता आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रालाही बसू लागली आहे. फिफा विश्वचषक 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेत दाखल झालेल्या इराक राष्ट्रीय फुटबॉल संघाचा मुख्य स्ट्रायकर आयमेन हुसेन याला शिकागो विमानतळावर अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी तब्बल 7 तास रोखून धरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’च्या हवाल्याने ‘हिंदुस्थान टाईम्स‘ने यासंदर्भातील वृत्त दिले असून क्रीडा वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या संयुक्त यजमानपदाखाली 12 जूनपासून फिफा विश्वचषक सुरू होत आहे. या ऐतिहासिक स्पर्धेसाठी इराकचा संघ शिकागो येथे उतरला होता. मात्र, विमानतळावर उतरताच अमेरिकेच्या ‘कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन’ अधिकाऱ्यांनी इराकी शिष्टमंडळाची कडक तपासणी सुरू केली. विशेष म्हणजे ज्या आयमेन हुसेनच्या निर्णायक गोलमुळे इराकने तब्बल 40 वर्षांनंतर विश्वचषकासाठी पात्रता मिळवली, त्याला एखाद्या संशयित गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली. 7 तास चाललेल्या या चौकशीदरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांनी आयमेनचा वैयक्तिक मोबाईल फोन आणि डिजिटल चॅट्स देखील तपासले, असे इराकी फुटबॉल फेडरेशनच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या कारवाईचा फटका इराक संघाचे अधिकृत फोटोग्राफर तलाल सालाह यांनाही बसला. तलाल यांना तब्बल 10 तासांपेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवण्यात आले होते. त्यांच्याही फोनची कसून तपासणी करण्यात आली आणि अखेर त्यांना अमेरिकेत प्रवेश देण्यास नाकारण्यात आला आणि तिथूनच मायदेशी परत पाठवण्यात आले.
खेळपट्टीवरील कामगिरी व्यतिरिक्त ज्या खेळाडूबद्दल कधीही चर्चा झाली नाही अशा खेळाडूला 7 तास थांबवून ठेवण्यास सक्षम असलेल्या देशाला विश्वचषक बहाल केल्याबद्दल FIFA चे अभिनंदन.
जेव्हा इराकचा सर्वाधिक गोल करणारा, सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी पात्र ठरला… pic.twitter.com/FJvO2TEitf
— इराक FRA (@IraqFootFR) 6 जून 2026
Comments are closed.