मुंबई विमानतळावरील सोने तस्करीत रवींद्र चव्हाणांचे ‘डावे-उजवे’ अडकले, फडणवीस गप्प का? संजय राऊत यांचा निशाणा
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तस्करीविरोधी मोहीम राबवत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास करण्यात आलेल्या या धडक कारवाईत सुमारे 5 कोटींहून अधिक किमतीचे सोने आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचेरकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक केली.
अजित आचेरकर हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुहास माटे यांच्या नेतृत्वाखालील युनियनमध्ये कार्यरत आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित युनियनच्या पदाधिकाऱ्यालाच थेट तस्करीच्या प्रकरणात अटक झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
ते पुढे म्हणाले की, मुंबई विमानतळावर वर्षानुवर्षे शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेना मजबुतीने काम करत असताना तिथे भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी दादागिरी करून आणि धमक्या देऊन स्वतःची युनियन घुसवायचा प्रयत्न केला. विमानतळावरील सोने तस्करी आणि चोरीवर स्वतःचा ताबा राहावा म्हणूनच भाजपला तिथे आपली युनियन हवी होती. काल झालेल्या कारवाईत रवींद्र चव्हाणांचे ‘डावे-उजवे’ मानले जाणारे लोकच थेट तस्करी करताना पकडले गेले आहेत.
मुंबई विमानतळावर सातत्याने घडणाऱ्या सोने चोरीच्या घटनांमध्ये भाजपचे लोक सामील आहेत, हे आम्ही वारंवार सांगत होतो; कालच्या कारवाईने ते सिद्ध झाले आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी रविवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.
राज्यातील घोडेबाजार बाजूला ठेवा आणि आधी यावर बोला. मुद्रा पोर्टवर ड्रग्स येते, ते पोर्ट कोणाच्या ताब्यात आहे आणि मुंबई विमानतळावर चालणारी सोने तस्करी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? मुंबई विमानतळावर सातत्याने सोने तस्करी, चोरीच्या घटना घडत आहेत. त्यात भाजपचे लोक सामील आहेत हे आम्ही वारंवार सांगत आहोत. भाजपमधील हाजी मस्तान कोण आहेत, हे आता आम्ही जाहीर करू का? असा थेट इशाराही राऊत यांनी दिला.
महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वागणे, बोलणे, डोलणे आणि चालणे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कधीच शोभणारे नव्हते. कोकणात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पैशाचा अतिरेकी वापर केला. जिल्हा बँक निवडणूकही याच पद्धतीने ताब्यात घेतली. यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून? हा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर काल रात्री मिळालं. चव्हाण हे मधल्या काळात अचानक मुंबई विमानतळावर कामगार संघटनेच्या कामात घुसले. त्यांनी इतर संघटना फोडून विमानतळावर नियंत्रण मिळवले. गुंडांच्या टोळ्या उभ्या केल्या व पोसल्या आणि आता त्याच लोकाना सोने तस्करी प्रकरणात डीआरआयने अटक केली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. याच्या खोलात जाऊन चौकशी केली तर भाजपा पैसा कुठून कमावतो, हे उघड होईल, असेही राऊत यांनी एक्स पोस्ट करत म्हटले.
महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण
यांची वागणे , बोलणे ,डोलणे आणि चालणे राज्याच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कधीच शोभणारे नव्हते.
कोकणात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पैशाचा अतिरेकी वापर केला. जिल्हा बँक निवडणूकही याच पद्धतीने ताब्यात घेतली.
यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून?… pic.twitter.com/bUYrrVq2Lk— संजय राऊत (@rautsanjay61) ७ जून २०२६
दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांना पुन्हा ईडीची नोटीस देण्यात आली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ही चौकशी सुरू असून त्यामागील कारण समजत नाही. त्या चौकशीला दिशा नाही. वैभव नाईक राजकारणामध्ये सक्रिय झाले, काही आंदोलन करायला लागले की ताबडतोब त्यांना नोटीस येते, आम्हालाही येते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा प्रकरणात लक्ष घातले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
Comments are closed.