‘द लास्ट डान्स’! नेमारची तीन शब्दांत फुटबॉलविश्वाला धडकी, ब्राझीलला वर्ल्डचॅम्प करण्याचे स्वप्न

फुटबॉलच्या मैदानावर काही खेळाडू चेंडूला लाथ मारत नाहीत… ते त्याच्याशी संवाद साधतात. काही खेळाडू गोल करत नाहीत… ते लाखो चाहत्यांच्या हृदयावर स्वाक्षरी करून जातात. ब्राझीलच्या पिवळय़ा जर्सीतून मैदानावर उतरलेला कुरळय़ा केसांचा तो मुलगा गेली जवळपास दोन दशके फुटबॉलप्रेमींसाठी केवळ खेळाडू नव्हता; तो आनंदाचा, आशेचा आणि जादूचा दुसरा शब्द होता. आजही नेमार चेंडू पायाशी घेतो तेव्हा काळ काही क्षण थांबल्यासारखा वाटतो. बचावपटू गोंधळतात, प्रेक्षक श्वास रोखतात आणि स्टेडियममधल्या हजारो मोबाईल कॅमेऱ्यांपेक्षा जास्त वेगाने आठवणी तयार होतात. पण प्रत्येक जादूगाराची एक अखेरची करामत असते. प्रत्येक महान कलाकाराचा एक शेवटचा पडदा असतो आणि आता नेमारने स्वतःच त्या पडद्याची चाहूल दिली आहे. फक्त तीन शब्द… ‘द लास्ट डान्स!’

नेमार हे शब्द सोशल मीडियावर उमटले आणि फुटबॉलविश्वाच्या छातीत एक वेदनादायी धडकी भरली. कारण ही केवळ एक कमेंट नव्हती. तो कदाचित एका युगाच्या समाप्तीचा इशारा होता. तो त्या चाहत्यांसाठी भावनिक क्षण होता, ज्यांनी नेमारसोबत तारुण्य जगलं, त्याच्या ड्रिब्लिंगवर वेडं प्रेम केलं, त्याच्या अश्रूंनी डोळे पाणावले आणि त्याच्या जखमांनी मन हेलावलं. आगामी वर्ल्ड कप हा खरोखरच नेमारचा अखेरचा विश्वचषक ठरणार आहे का? ब्राझीलच्या सांबा फुटबॉलच्या शेवटच्या महान नर्तकाचा हा अंतिम नृत्याविष्कार असेल का?

तीन शब्दआणि जगभरात चर्चांचा स्फोट!

‘फिफा’ने नेमारच्या कारकीर्दीतील काही अविस्मरणीय क्षणांचा फोटोसंग्रह पोस्ट केला. त्यावर लिहिले होते, ‘वुई वॉचड् हीम ग्रो अप’ (तो आमच्या डोळ्यांसमोर लहानाचा मोठा झाला). हे वाक्यच अनेक चाहत्यांना भावुक करण्यासाठी पुरेसे होते. कारण जगाने खरोखरच त्याला मोठं होताना पाहिलं आहे. सँटोसच्या मैदानावरून युरोपच्या प्रकाशझोतात झेपावलेला, करोडो चाहत्यांचा लाडका बनलेला आणि ब्राझीलच्या आशा खांद्यावर वाहणारा नेमार सर्वांनी पाहिला आहे. मात्र त्या पोस्टखाली आलेल्या त्याच्या ‘द लास्ट डान्स’ या प्रतिक्रियेनंतर चर्चांचा महापूर आला.

एक अपूर्ण स्वप्न अजूनही डोळय़ांत

नेमारने जवळपास सर्व काही जिंकलं. क्लब फुटबॉलमध्ये ट्रॉफीजचा वर्षाव केला. वैयक्तिक पुरस्कार मिळवले. गोलांचे डोंगर उभे केले. पण त्याच्या कारकीर्दीत एक स्वप्न अजूनही अपूर्ण आहे, ब्राझीलसाठी विश्वचषक उंचावण्याचं. 2014 मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या विश्वचषकात जखमी होऊन तो उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला. त्यानंतर ब्राझीलचा जर्मनीकडून झालेला 7-1 चा पराभव आजही फुटबॉल इतिहासातील सर्वात वेदनादायी आठवणींपैकी एक आहे.2018 आणि 2022 मध्येही विश्वविजेतेपदाचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

गोलसम्राट, पण जखमांचा कैदी

ब्राझीलसाठी 128 सामने आणि 79 गोल. आकडेवारी त्याला देशाचा सर्वोत्तम गोलस्कोरर ठरवते. पण या आकड्यांमागे जखमांशी केलेलं युद्ध दडलं आहे. एसीएलची गंभीर दुखापत, वारंवार होणाऱ्या स्नायूंच्या समस्या आणि फिटनेससाठीचा संघर्ष… गेली काही वर्षे नेमार प्रतिस्पर्ध्यांपेक्षा स्वतःच्या शरीराविरुद्धच अधिक लढताना दिसला आहे.

शेवटचा नृत्याविष्कार च्या अमरत्वाची संधी?

मायकेल जॉर्डनच्या ‘द लास्ट डान्स’प्रमाणेच नेमारचा हा संदेश एका महान अध्यायाच्या समाप्तीची चाहूल देतो. मात्र फुटबॉलचे चाहते अजूनही आशावादी आहेत. कारण काही कलाकार शेवटच्या प्रयोगातच सर्वोत्तम अभिनय करतात. काही योद्धे शेवटच्या लढाईतच इतिहास लिहितात आणि काही जादूगार शेवटच्या करामतीने अमर होतात.

कदाचित हा नेमारचा अखेरचा विश्वचषक असेल. कदाचित ब्राझीलच्या जर्सीतला शेवटचा महान प्रवास. पण जर हा खरोखरच ‘द लास्ट डान्स’ असेल तर फुटबॉलविश्वाला एकच आशा आहे की, हा पदलालित्याविष्कार संपताना नेमारच्या हातात विश्वचषक असावा.

Comments are closed.