महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद झाले.
हुतात्मा जवान सातारा-कराड अन् नवी मुंबई-ऐरोलीचे रहिवासी
न्यूज एजन्सी/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एक मोठा स्फोट होऊन महाराष्ट्रातील दोन जवान हुतात्मा झाले, अशी माहिती सुरक्षा दलाने बुधवारी दिली. हुतात्मा जवानांची ओळख अर्जुन राजेंद्र जाधव आणि विक्रम बाळकृष्ण जाधव अशी पटली असून, दोघेही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना श्रीनगरच्या बदामीबाग छावणीतील आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. दोन्ही जवान आठव्या राष्ट्रीय रायफल्सचे होते. दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाल्याने महाराष्ट्रासह देशात हळहळ व्यक्त होत आहेत.
जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये मंगळवारी ग्रेनेडचा अपघाती स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. उरीच्या कमलकोट येथील एका कॅम्पमध्ये नियमित साहित्य हस्तांतरणादरम्यान हँडग्रेनेडचा अपघाती स्फोट झाल्याने दोन जवान जखमी झाले होते. जखमी जवानांवर लष्कराच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आता आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप उलगडलेले नाही. हुतात्मा जवान विक्रम चव्हाण हा नवी मुंबई-ऐरोली येथील तर अर्जुन राजेंद्र चव्हाण हा सातारा जिह्यातील कराड तालुक्यातील शहापूरचा रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली.
नियमित तपासणीदरम्यान नियंत्रण रेषेजवळ स्फोट
लष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी उरीच्या कमलकोट भागातील एका लष्करी छावणीत नियमित शस्त्र हस्तांतरण सुरू होते. याचदरम्यान, चुकून एक हँड ग्रेनेड सक्रिय होऊन त्याचा शक्तिशाली स्फोट झाला. या अचानक झालेल्या स्फोटात तेथे उपस्थित असलेले दोन जवान गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर लगेचच दोन्ही जखमी जवानांना श्रीनगर येथील भारतीय लष्कराच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान दोघांचेही प्राण गेल्याने ते देशासाठी हुतात्मा ठरले. या दु:खद अपघाताची बातमी त्यांच्या मूळ गावी पोहोचताच, संपूर्ण परिसरात शोकाची लाट पसरली. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनामार्फत यासंबंधीची माहिती कळविण्यात आली असून लवकरच त्यांचे पार्थिव मूळ गावी दाखल होणार आहेत.
गेल्या आठवड्यात राजौरीमध्ये अपघात
अलीकडच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये लष्कराचा समावेश असलेला हा दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी गेल्या शनिवारी राजौरी येथे दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान एका दु:खद अपघातात एक तरुण लष्करी अधिकारी हुतात्मा झाला होता. हुतात्मा अधिकाऱ्याची ओळख लेफ्टनंट वीरेश्वर गोस्वामी अशी झाली आहे. एका अरुंद डोंगराळ वाटेवर शोध मोहिमेदरम्यान ते आपल्या पथकाचे नेतृत्व करत असताना अचानक त्यांचा पाय घसरून ते 30 फूट खोल दरीत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
काश्मीर खोऱ्यात ‘ऑपरेशन शेरवाली’ सुरूच
भारतीय लष्कर गेल्या दोन आठवड्यांपासून राजौरीसह जम्मू काश्मीरच्या अनेक संवेदनशील जिह्यांमधील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी एक मोठी मोहीम राबवत आहे. या विशेष मोहिमेला ‘ऑपरेशन शेरवाली’ असे नाव देण्यात आले आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला राजौरीच्या घनदाट जंगलात काही धोकादायक दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसर सील करत एक मोठी शोधमोहीम सुरू केली. तथापि, पकडले जाण्याच्या भीतीने दहशतवादी जंगलात सतत आपली ठिकाणे बदलत असल्याची भीती सुरक्षा दलांना वाटत असल्यामुळे लष्कराची मोहीम पूर्ण सतर्कतेने अजूनही सुरू आहे.
Comments are closed.