शिवसेनेच्या आंदोलनाचा दणका; पालिकेकडून गोदावरीची स्वच्छता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिणकाशी नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीतील श्रीरामकुंड येथे सोमवारी दुर्गंधीयुक्त गाळात उतरून शिवसेनेने आंदोलन केले. या दणक्यानंतर खडबडून जागे झालेल्या नाशिक महापालिका प्रशासनाने बुधवारपासून गोदावरी नदी स्वच्छतेला सुरुवात केली आहे. स्वच्छता आणि पावित्र्य कायम राखण्यासाठी हा लढा सुरूच राहील, असा निर्धार महापालिका शिवसेना गटनेते केशव पोरजे यांनी व्यक्त केला.

सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना  श्रीरामकुंडासह गोदावरीचे संपूर्ण पात्र गाळाने भरले आहे, नदीत थेट ड्रेनेजचे पाणी सोडले जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे, ही दैन्यावस्था दूर व्हावी, गोदावरीची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, प्रशासनाला जाग यावी, यासाठी सोमवारी शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱयांनी दुर्गंधीयुक्त गाळात उतरून आंदोलन केले. निक्रिय महापालिका प्रशासनाचा निषेध केला. आठ दिवसात स्वच्छता केली नाही, तर महापालिकेवर धडक देण्यात येईल, असा इशारा दिला होता.

शिवसैनिकांच्या एकजुटीमुळेच हे शक्य- आदित्य ठाकरे

नाशिकमधील पवित्र गोदामाईच्या प्रदूषणाविरोधात शिवसैनिक आणि नगरसेवकांनी आंदोलन करीत सुस्त यंत्रणेला जाब विचारला होता. त्यांच्या ताकदीचा दणका एवढा जोरदार होता की, प्रशासनाने आता तातडीने हालचाली करीत नदी आणि श्रीरामकुंडाच्या साफसफाईला सुरुवात केली आहे. सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर असताना प्रशासनाची ही बेपर्वाई नाशिककरांच्या आणि भाविकांच्या आरोग्याशी खेळणारी होती. यंत्रणेने गोदामाईच्या स्वच्छतेबाबत कायम सतर्क राहून वेळीच उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. नाशिकमधील सर्व शिवसैनिक आणि नगरसेवकांनी उठवलेल्या आवाजामुळे आणि एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे, अशी ‘एक्स’वरून पोस्ट शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Comments are closed.