किन्हवलीत हातभट्ट्यांवर छापे, शाईनदी पात्रातील दारूचे साठे, ड्रम, साहित्य केले नष्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील १८ जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला होता. या पाश्र्वभूमीवर खाडीकिनारी झुडपांमध्ये दारूचे गुत्ते चालवणाऱ्यांना किन्हवली पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पोलीस पथकाने धाड टाकत दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत रसायनाने भरलेले ९ ड्रम पोलिसांनी फोडून टाकले. अचानक दिलेल्या या तडाख्याने हातभट्टीवाल्यांची पळताभुई थोडी झाली आहे.

सावरोली, सोगाव परिसरातील खरांगण, खरपत, नामपाडा, बेलकडी, गांगणवाडी या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवली जाते. स्वस्त आणि विषारी दारूमुळे अनेक आदिवासी बांधवांसह सावरोली गावातील तरुणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्याच आठवड्यात दारूच्या आहारी गेलेल्या गांगणवाडी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. किन्हवली पोलिसांनी अचानक खरपत- खरांगण गावांच्या हद्दीत शाईनदीच्या किनारी धाड टाकून गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केले.

दोघांवर गुन्हा

किन्हवली पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने माळद-कांबा गावांच्या शिवारातील शाईनदीच्या पात्राशेजारी हातभट्टीची दारू तयार करण्याच्या ठिकाणावर धाड टाकली. यावेळी हातभट्टीचे साहित्य, दारूचे वॉश जागेवरच नष्ट केले. याप्रकरणी बाळू शिद आणि दीपक कडाळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत किन्हवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार, पोलीस हवालदार अरुण यशवंतराव, पोलीस शिपाई सतीश शेलवले, नवनाथ गवारी, वैभव शिंपी यांनी सहभाग घेतला.

Comments are closed.