हिंदुस्थानातील कर्मचाऱ्यांसाठी ‘ओपनडोअर’ची दारं बंद; आमचे ग्राहक अमेरिकेत राहतात! दिले कारण, २५० जणांवर बेकारीची कुऱ्हाड

अमेरिकेतील रिअल इस्टेट तंत्रज्ञान कंपनी ‘ओपनडोअर’ने हिंदुस्थानातील आपले कामकाज बंद करण्याचे जाहीर केले असून, या निर्णयाचा फटका जवळपास २५० कर्मचाऱ्यांना बसणार आहे. ओपनडोअरचे सीईओ काझ नेजातियन यांनी ही घोषणा केली; ते म्हणाले की, ‘कंपनी आपल्या व्यवसाय परिवर्तन धोरणाचा एक भाग म्हणून आपले कामकाज सांभाळणारी पदे अमेरिकेतील नागरिकांनाच देत ग्राहकांच्या अधिक जवळ आणत आहे’.

कर्मचाऱ्यांसोबत शेअर केलेल्या आणि नंतर ‘एक्स’ वर पोस्ट केलेल्या एका नोटमध्ये नेजातियन यांनी सांगितले की, कंपनीने गेल्या काही महिन्यांत काही पदे आधीच अमेरिकेत स्थलांतरित करण्यास सुरवात केली होती. या नुकत्याच घेतलेल्या निर्णयाने ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि ओपनडोअरचे हिंदुस्थानातील कामकाज पूर्णपणे बंद केले जाईल.

या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना नेजातियन म्हणाले की, ओपनडोअरचे ग्राहक अमेरिकेत आहेत आणि त्यांना सेवा देणारे कामकाजाचे व्यवस्थापन हे त्या ग्राहकांच्या जास्तीत जास्त जवळून करणे सर्वात सोयीचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, कंपनीने वेगवेगळ्या सिस्टीममधील मॅन्युअल वर्कफ्लो सांभाळण्यासाठी यापूर्वी हिंदुस्थानात एक मोठी टीम तयार केला होता, परंतु तंत्रज्ञानातील सुधारणा आणि अमेरिकेत ‘एआय’ (AI) समावेशामुळे ही कामे परदेशात ठेवण्याची गरज आता कमी झाली आहे.

नेजातियन यांनी यावर भर दिला की, या निर्णयाचा हिंदुस्थानातील टीमच्या परफॉर्मन्सशी कोणताही संबंध नाही. त्यांनी हिंदुस्थानातील कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले आणि त्यांचे वर्णन ‘टॅलेंटेड प्रोफेशनल्स’ असे केले. तसेच या व्यक्ती इतर संस्थांसाठी मोलाच्या ठरतील असे देखील ते म्हणाले.

कंपनीने सांगितले की, बाधित कर्मचाऱ्यांना या कठीण काळात बदल स्वीकारण्यासाठी मदत ट्रान्झिशन सपोर्ट दिली जाईल, ज्यामध्ये सिव्हरन्स पॅकेजेस, नवीन नोकरी शोधण्यासाठी मार्गदर्शन आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. काही महत्त्वाच्या कामांचे व्यवस्थापन सुरळीतपणे हस्तांतरित करण्यासाठी मोजकेच कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात कामावर राहतील.

कर्मचारी कपात झाली असली, तरी ओपनडोअर अजूनही मजबूत स्थितीत आहे आणि त्यांच्या व्यवसायाची एकूण रणनीती बदललेली नाही, असे नेजातियन म्हणाले. ते पुढे म्हणाले की, अमेरिकेतील घरमालकांना सेवा देण्यावर आपले लक्ष केंद्रित ठेवत असतानाच, कामकाजात सुटसुटीतपणा आणणे, एकच प्लॅटफॉर्म तयार करणे आणि मॅन्युअल प्रक्रियांवरील अवलंबित्व कमी करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Comments are closed.