100 दशलक्ष डॉलर्सचा महाघोटाळा, हिंदुस्थानी वंशाच्या व्यावसायिकाला कॅलिफोर्नियात अटक; 30 वर्षांच्या शिक्षेची शक्यता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यावसायिकाला गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने बिझनेस लोन मिळवण्यासाठी बँकेची तब्बल 100 दशलक्ष डॉलर्सची (सुमारे 800 कोटींहून अधिक रुपये) फसवणूक केल्याचा आरोप आहे. महेंद्र मखिजानी (वय 44, रा. कोरोना डेल मार) असे या आरोपीचे नाव असून, अमेरिकेच्या न्याय विभागाने बुधवारी ही कारवाई केली. महेंद्रने खोटे कागदपत्र सादर करून कर्जासाठी तारण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्य प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा खूप जास्त दाखवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला 30 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

इंडिया टु़डेने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायालयातील कागदपत्रांनुसार, महेंद्र मखिजानी हा न्यूपोर्ट बीच येथील ‘कॅंटर ग्रुप’ (Cantor Group) नावाच्या कंपनीचा प्रमुख आहे. या कंपनीचे ‘बँक #1’ या एका सरकारी विमाधारक बँकेसोबत व्यावसायिक संबंध होते. या करारांतर्गत, बँकेने कॅंटर ग्रुपला रिअल इस्टेट क्षेत्रातील कर्जांचे व्यवहार करण्यासाठी सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला होता. त्याबदल्यात कॅंटर ग्रुपने ज्यावर त्यांचा ‘पहिला हक्क’ असेल अशी संबंधित मालमत्ता बँकेकडे तारण म्हणून ठेवणे बंधनकारक होते. अशी अटच त्या करारामध्ये होती.

दरम्यान जर कर्जदाराने पैसे बुडवले, तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या बँकेला आपली रक्कम वसूल करण्याचा पहिला अधिकार मिळतो. ज्यामुळे हे तारण अधिक सुरक्षित मानले जाते. मात्र, सप्टेंबर 2024 ते एप्रिल 2025 दरम्यान महेंद्रने टायटल इन्शुरन्सच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केला. प्रत्यक्षात इतर व्यक्तींचा त्या मालमत्तांवर पहिला हक्क असताना, त्याने स्वतःचाच पहिला हक्क असल्याचे खोटे भासवले.

हा घोटाळा लपवण्यासाठी महेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अडोबी सॉफ्टवेअरचा वापर करून मूळ कागदपत्रांमध्ये बदल केले. यानंतर डिजिटल पुरावे किंवा ‘मेटाडेटा’ नष्ट करण्यासाठी त्यांनी या कागदपत्रांची प्रिंट काढून ती पुन्हा स्कॅन केली आणि बँकेला सादर केली. एवढेच नव्हे तर बँकेने या त्रुटींबद्दल शंका उपस्थित केली असता, महेंद्रने फोन कॉल्स आणि खोट्या स्प्रेडशीटद्वारे बँकेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अखेर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, ऑगस्ट 2025 मध्ये बँकेने लॉस एंजेलिसच्या न्यायालयात गुन्हा दाखल केला असून आता त्याला अटक करण्यात आली आहे.

Comments are closed.