पॅकिंग मशीनमध्ये हात अडकून बालकामगाराची चार बोटे तुटली, वसईच्या पेल्हारमधील दुर्दैवी घटना; कंपनीमालक, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नालासोपाऱ्याच्या पेल्हार परिसरातील एका कंपनीत काम करत असताना पॅकिंग मशीनमध्ये हात अडकल्याने बालकामगाराची चार बोटे तुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात १२ वर्षीय अंश भारती हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात कंपनीमालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील एस. एन. होम कंपनीत अंश भारती काम करतो. पॅकिंग मशीनवर काम करत असताना अंशचा हात अचानक चालू मशीनमध्ये अडकला. मशीनचा दाब इतका प्रचंड होता की, त्याच्या हाताची चार बोटे चिरडली जाऊन जागीच तुटली. या भीषण अपघातात अंश गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारवाईची मागणी
कायद्यानुसार बालमजुरीवर पूर्णपणे बंदी असतानाही कंपनीमालक आणि व्यवस्थापकाने या अल्पवयीन मुलाला कामावर ठेवले होते. एवढेच नव्हे तर त्याला अत्यंत धोकादायक असलेल्या पॅकिंग मशीनवर काम करण्यास ठेवले होते. औद्योगिक पट्ट्यांमध्ये अनेक छोट्या कारखान्यांमध्ये छुप्या पद्धतीने बालकामगार ठेवले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कामगार विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या ‘जिल्हा कृती दल’ ने अचानक धाडी टाकणे आणि कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Comments are closed.