VIDEO: बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाची स्थिती 0/3, वनडेच्या इतिहासात पहिल्यांदाच कांगारूची मान शरमेने झुकली!

ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघसाठी गुरूवारचा (११ जून) दिवस लाजिरवाणा ठरला. सध्या ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बांगलादेशने यातील पहिला सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यामध्येही त्यांनी आश्चर्यचकित करणारी सुरूवात केली.

झाले असे की, दोन्ही संघांमधील दुसरा वनडे सामना ढाकामध्ये खेळला गेला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोस इंग्लिसने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकल्याचे दिसले. कारण संघाचे खाते उघडण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या तीन विकेट्स गमावल्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने यापूर्वी कधीही इतक्या विकेट्स शून्यावर गमावल्या नव्हत्या. बांगलादेशनेही इतिहास रचला. त्यांनी दोन संघांविरुद्ध शून्य धावसंख्येवर ३ विकेट् घेण्याची कामगिरी केली आहे.

बांगलादेशकडून प्रथम गोलंदाजी करण्यास तस्किन अहमद आला. त्याने पहिल्याच षटकातील तीन चेंडूंवर एकही धाव दिली नाही. त्यानंतर चौथ्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टला क्लीन बोल्ड केले. पुढे कर्णधार इंग्लिस फलंदाजीसाठी आला. तोही पुढच्या दोन चेंडूंवर एकही धाव काढू शकला नाही. मुस्तफिजुर रहमानने दुसरे षटक टाकले. त्याने पहिल्याच चेंडूवर कूपर कॉनोलीला बाद केले. तो सुद्धा संघाचे खाते उघडण्यात अपयशी ठरला आणि पहिल्याच चेंडूवर विकेट गमावून बसला. त्यानंतर मॅट रेनशॉ फलंदाजीसाठी आला.

मुस्तफिजुर रेनशॉविरुद्ध चार निर्धाव चेंडू टाकले. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रेनशॉ लिटन दासकरवी झेलबाद झाला. तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्थिती १.६ षटकांत ० धावसंख्येवर ३ विकेट्स अशी झाली. ऑस्ट्रेलियाच्या वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिले तीन फलंदाज खाते न उघडताच विकेट गमावून बसले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने एक धाव, दोन धावा आणि चार धावांवर प्रत्येकी ३ विकेट्स गमावल्या होत्या, मात्र पहिल्यांदाच संघाने एकही धाव न काढता ३ विकेट्स गमावल्या.

वनडे क्रिकेटच्या इतिहासात ३ विकेट्स गमावून संघाची धावसंख्या शून्य असण्याची ही एकूण चौथी वेळ आहे. २००३ च्या विश्वचषक सामन्यात श्रीलंकेच्या चमिंडा वासने हॅट्ट्रीक घेतली होती, तेव्हा बांगलादेश शून्य धावांवर ३ विकेट्स गमावणारा पहिला संघ ठरला होता. या यादीत दुसऱ्या स्थानी कॅनडा आहे. त्यांनी २००६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

झिम्बाब्वेने २००९ मध्ये बांगलादेशविरुद्ध शून्य धावसंख्येवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. यामुळे बांगलादेश हा पहिलाच संघ ठरला, ज्यांनी दोन संघांविरुद्ध शून्य धावसंख्येवर तीन विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

Comments are closed.