राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचा तटकरेंना टोला; संपूर्ण भाषणात शरद पवारांचे दाखले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस केवळ पक्ष नाही तर ती संस्था आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारा विचार आहे. हा पक्ष वाढवताना ज्यांनी रक्ताचं पाणी केलं ते अजितदादा आपल्यात नाहीत. त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांच्या चरणी निष्ठा वाहायच्याआहेत असं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे यांनाही टोला लगावला. खेळात राजकारण आणू नका, राजकारणाचा खेळ करू नका असं भुजबळ म्हणाले. भुजबळांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी ज्या घडामोडी घडल्या त्या सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात (NCP Foundation Day) भुजबळ बोलत होते.

Chhagan Bhujbal Speech : खेळात राजकारण नको, भुजबळांचा टोला

खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात छगन भुजबळांचा कबड्डीपटू म्हणून उल्लेख केला होता. त्यावर बोलतान छगन भुजबळांनी तटकरेंना टोला लगावला. ते म्हणाले की, खेळात राजकारण आणू नका, राजकारणाचा खेळ करू नका. पक्षापेक्षा कुणी मोठं नाही. पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही तर तो कार्यकर्त्यांचा मोठा समूह आहे. त्यामुळे पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. पदं म्हणजे आळवावरचं पाणी, कधी निसटून जाईल हे सांगता येत नाही. ज्या निष्ठा आम्ही अजितदादांच्या चरणी वाहिल्या होत्या, त्या निष्ठा आता सुनेत्रा पवारांच्या चरणी वाहायच्या आहेत.

Chhagan Bhujbal On Sharad Pawar : शरद पवारांचा दाखला

छगन भुजबळांनी त्यांच्या भाषणात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची स्थापना कशी झाली याची माहिती सांगितली. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या नावाचा अनेकदा दाखला दिला. ते म्हणाले की, “शरद पवारांना काँग्रेसमधून काढण्यात आलं. त्यावेळी हे प्रकरण त्यांना सहज मिटवता आलं असतं. पण तसं झालं नाही. त्यानंतर इतिहास घडला. त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळी घड्याळ हे चिन्ह आपल्याला मिळालं. 19 मे 1999 रोजी, काही नेते मला भेटायला आले. ते सगळे रक्तबंबाळ झाले होते. त्यावेळी पवार साहेबांचा पुतळा काही काँग्रेसवाले जाळत होते, तो पुतळा आमच्या लोकांनी जाळू दिला नाही. त्यावेळी ते जखमी झाले. ती घटना आजदेखील मला आठवते.”

राष्ट्रवादीवर छगन भुजबळ : मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली

भुजबळ पुढे म्हणाले की, “काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी मला काँग्रेसमधून अनेकांचे फोन आले. तुम्ही काँग्रेसमध्ये या, आजच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करतो अशी ऑफर देण्यात आली. पण मी ती नाकारली. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारासाठी पवार साहेबांना साथ दिली. आज हा पक्ष वाढवला याचा आनंद मला आहे.”

राष्ट्रवादी ही केवळ एक पार्टी नाही तर ती सामाजिक संस्था आहे. सर्व विचारांना पुढे घेऊन जाणारी संस्था आहे. हा पक्ष वाढवत असताना ज्यांनी रक्ताचं पाणी करून काम केलं, ते आज अजितदादा आपल्यात नाहीत. त्यांचं योगदान शब्दात मांडता येणार नाही. त्यांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत. सत्ता हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. त्यासाठी राजकारण करायचं आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

ही बातमी वाचा:

Comments are closed.