हार्दिक पंड्याची दुखापत आणि संघाची डोकेदुखी; टीम इंडियाने पर्यायी अष्टपैलू खेळाडू शोधावा, माजी खेळाडूची मागणी
IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला दुखापतीने घेरलं होतं. त्यामुळे अनेक सामन्यांमध्ये तो संघाबाहेर होता. आता पुन्हा एकदा पाठीच्या दुखापतीमुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडावं लागलं. हार्दिक पंड्याची दुखापत आणि आगामी वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचा माजी खेळाडू सुरेश रैनाने टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हिंदुस्थानने त्याच्या जागी एक खंबारी आणि विश्वासार्ह पर्याय लवकरात लवकर तयार करण्याची गरज त्याने व्यक्त केली आहे.
‘जिओस्टार’शी बोलताना रैना म्हणाला, “हार्दिक पांड्याची दुखापतींची मालिका ही संघासाठी चिंतेची बाब आहे. पुढील एकदिवसीय विश्वचषक येईपर्यंत हिंदुस्थानकडे त्याचा एक सक्षम पर्याय तयार असायलाच हवा.” आयपीएल २०२६ चा हंगाम देखील हार्दिक पांड्यासाठी दुखापतींमुळे चढ-उतारांचा ठरला. मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना दुखापतीमुळे त्याला अनेक सामन्यांना मुकावे लागले होते. अगदी हंगामाच्या शेवटच्या काही सामन्यांमध्येच तो पुनरागमन करू शकला. या दुखापतींचे सत्र इथेच थांबले नसून, आता पाठीच्या त्रासानंतर हार्दिकला मांडीच्या स्नायूंची दुखापत झाली आहे. या ताज्या दुखापतीमुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावे लागले आहे. सध्या तो बंगळुरू येथील बीसीसीआयच्या (BCCI) ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये तंदुरुस्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
पुढील वर्षी होणारा एकदिवसीय विश्वचषक डोळ्यांसमोर ठेवून BCCI हार्दिकच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर बारीक लक्ष ठेवून आहे. हार्दिक पांड्या फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर सामना जिंकवून देण्याची क्षमता ठेवतो, त्यामुळे तो संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र, त्याच्या सततच्या दुखापतींमुळे टीम इंडियाकडे दर्जेदार ‘पेस-बॉलिंग ऑलराउंडर’ची किती कमतरता आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
Comments are closed.