रोहित-विराटची उपस्थिती शुबमन गिलसाठी फायदेशीर ठरेल का? वर्ल्ड कप 2027 बद्दल सुरेश रैनाचे मोठे विधान!

भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू, विराट कोहली (Virat Kohli and Rohit Sharma) आणि रोहित शर्मा यांनी कसोटी (Test) आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या ते फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही खेळाडू खेळणार की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. याच पार्श्वभूमीवर माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) एक महत्त्वाचे भाष्य केले आहे.

रैना यांच्या मते, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या अनुभवी खेळाडूंची उपस्थिती टीम इंडियासाठी अत्यंत मोलाची ठरू शकते. युवा कर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) या दोन्ही दिग्गजांच्या अनुभवाचा खूप मोठा फायदा होईल, असे रैनाला वाटते.

‘जियोस्टार’वर बोलताना सुरेश रैना म्हणाला, मोठ्या स्पर्धेत अनुभव खूप महत्त्वाचा असतो. रोहित आणि विराटचे आयसीसी वर्ल्ड कपमधील रेकॉर्ड्स जबरदस्त आहेत. त्यांनी भारताला अनेक सामने एकट्याच्या जोरावर जिंकून दिले आहेत आणि दबावाच्या परिस्थितीत कसं खेळायचं, हे त्यांना उत्तम ठाऊक आहे. त्यामुळे वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत शुबमन गिलला त्यांचे मार्गदर्शन मिळणे, ही टीम इंडियासाठी जमेची बाजू असेल.

रैना यांच्या मते, जर विराट आणि रोहित 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत फिट राहिले, तर त्यांचा अनुभव आणि सामने जिंकून देण्याची त्यांची क्षमता भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. 2023 मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने विक्रमांची लयलूट केली होती. त्याने 11 डावांत 765 धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला होता. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आले होते. या स्पर्धेत त्याने सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) एका वर्ल्ड कपमधील सर्वाधिक धावांचा (673) विक्रमही मोडीत काढला होता.

Comments are closed.