World Cup 2027: आयसीसी ODI वर्ल्ड कप 2027 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! 'या' दिवशी रंगणार अंतिम सामना
आयसीसीचा पुढचा मोठा इव्हेंट असलेला ‘वनडे वर्ल्ड कप 2027’ लवकरच क्रिकेट विश्वात धूमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, जिम्बाब्वे आणि नामीबिया हे तीन देश मिळून संयुक्तपणे भूषवणार आहेत. या स्पर्धेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घडामोडी आता समोर आल्या असून, क्रिकेटप्रेमींमध्ये आतापासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
रिपोर्टनुसार, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपची सुरुवात 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे, तर या स्पर्धेचा थरारक अंतिम सामना 21 नोव्हेंबर रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे. 48 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील सलामीच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यजमान देशांची विभागणी याप्रमाणे असणार आहे. मुख्य यजमान म्हणून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक 41 सामने खेळवले जातील. तसेच, जिम्बाब्वेमध्ये 8 ते 10 सामने आयोजित केले जाऊ शकतात. सोबतच नामीबियामध्ये 3 सामने होणार आहेत.
आजच्या काळातही वनडे वर्ल्ड कपबद्दलचे प्रेक्षकांचे आकर्षण सर्वात जास्त आहे. टी-20 वर्ल्ड कप दर दोन वर्षांनी होत असल्यामुळे त्याचे नवल काहीसे कमी झाले आहे, तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रभाव अद्याप वनडे वर्ल्ड कपइतका निर्माण झालेला नाही. त्यामुळे 48 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची चाहत्यांना मोठी प्रतीक्षा आहे.
2027 च्या या वर्ल्ड कपमध्ये मुख्यत्वे चार संघांवर सर्वांचे लक्ष असणार आहे. ते म्हणजे भारताने अलीकडच्या काळात वनडे फॉरमॅटमध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेसाठी सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. गतविजेता असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ आपला किताब वाचवण्यासाठी मैदानात उतरेल. मोठ्या स्पर्धेत ‘कॅश-इन’ करण्याची आणि सातत्य राखण्याची त्यांची क्षमता पाहता, ते सर्वात मोठे आव्हान असतील. तसेच स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ नक्कीच या शर्यतीत असेल आणि त्यांना आपल्या प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल.
Comments are closed.