एसटीच्या प्रसिद्धीला ब्रेक, जाहिरात खर्चावर 25 कोटींची घातली मर्यादा
आखाती युद्धामुळे राज्य सरकारने काटकसर करण्यास सुरुवात केली आहे. अपघातांबाबत जनजागृती करण्याच्या नावाखाली एसटी महामंडळाने तब्बल 44 कोटी 72 लाख रुपयांचा प्रसिद्धी माध्यम आराखडा तयार केला होता, पण वित्त खात्याने या खर्चावर आक्षेप घेतला असून 25 कोटी रुपयांच्या मर्यादेत खर्च करण्याची अट घातली आहे.
महाराष्ट्रात देशात सर्वाधिक रस्ते अपघात होतात. रस्ते अपघातात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विविध योजना आणि जनजागृती मोहीम राबवून 2030 या वर्षापर्यंत रस्ते अपघात 50 टक्क्यांपर्यंत आणण्याचे नियोजन परिवहन आयुक्तांनी केले आहे. मात्र वित्त विभागाच्या आक्षेपामुळे आता 25 कोटी रुपयांमधून रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र, चित्रपटगृहे, सार्वजनिक ठिकाणे, परिवहन सेवा, मेट्रो स्टेशन, एलईडी डिस्ल्पे, रोड शो, डिजिटल मीडियामधून जाहिराती प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत.
वित्त विभागाने घेतला आक्षेप
रस्ते अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभागाचा 44 कोटी 72 लाख 36 हजार रुपयांचा प्रसिद्धी माध्यम आराखडय़ास मान्यता देण्यात आली. दरम्यानच्या काळात आखाती युद्ध सुरू झाले. महागाई वाढल्याने राज्य सरकारने कपात करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे प्रसिद्धीसाठी केल्या जाणाऱया 44 कोटी 72 लाख रुपयांच्या खर्चावर वित्त विभागाने आक्षेप घेतला आणि 25 कोटी रुपयांच्या मर्यादेत प्रसिद्धीवर खर्च करण्याची अट वित्त विभागाने घातली आहे.
Comments are closed.