ट्रम्प यांचे एक विधान अन् शेअर मार्केटमध्ये बंपर तेजी; सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची चांदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारामध्ये बंपर तेजी पायाला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध संपवून लवकरच करार होण्याचे संकेत दिले आहेत. याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असून कच्च्या तेलाच्या किंमतीही प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी होताच जागतिक बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे थेट सकारात्मक पडसाद हिंदुस्थानच्या शेअर बाजारातही पाहायला मिळत आहेत.

देशांतर्गत बाजारात चौफेर खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देश निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. सेन्सेक्सने 1000 हून अधिक अंकांची झेप घेतली आहे, तर निफ्टीने 23,450 चा टप्पा पार केला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जवळपास दीड टक्क्यांची तेजी पाहायला मिळत आहे.

सध्या निफ्टीचे सर्व सेक्टर इंडेक्स हिरव्या रंगात न्हावून निघाले आहेत. मात्र, यामध्ये सर्वाधिक तेजी रियल्टी सेक्टरमध्ये दिसून येत आहे. या सेक्टरचा निफ्टी इंडेक्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. तर निफ्टी ऑटो आणि निफ्टी पीएसयू बँक 1.5 टक्के, प्रायव्हेट बँक इंडेक्स जवळपास 1.5 टक्के वाढ आणि एफएमसीजी, आयटी आणि फार्मा 0.5 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. या तुफानी खरेदीच्या वातावरणामुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप अवघ्या काही मिनिटांत जवळपास 7 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.

शुक्रवारी सकाळी बाजार उघडतात सेन्सेक्समध्ये 1012.38 अंकांची वाढ झाली आणि तो 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 74,844.93 वर पोहोचला. तर निफ्टीही 286.25 अंक म्हणजेच 1.24 टक्क्यांच्या वाढीसह 23,447.85 वर पोहोचला होता.

सेन्सेक्समधील फक्त 1 शेअर लाल

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी सुरुवातीच्या व्यवहारात टेक महिंद्रा या एकच शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे इंडिगो, एल अँड टी आणि ट्रेंट या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळत आहे. 56 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले आहेत, तर 43 शेअर्स लोअर सर्किटवर आले आहेत.

Comments are closed.