मुंबई विमानतळावर 11 किलो गांजा सापडला, माजी मॉडेल असलेल्या महिला बँक मॅनेजरला अटक, म्हणाली, ‘बँ

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (Customs Department) आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश करत एक मोठी कारवाई केली आहे. बँकॉकहून आलेल्या २९ वर्षीय ‘हर्षा सनी’ या तरुणीला तब्बल ११.८२४ किलो ‘हायड्रोपोनिक गांजा’ (Hydroponic Weed) या महागड्या अंमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ११ कोटी ८२ लाख रुपये इतकी आहे.(Mumbai Crime News)

Mumbai Crime News: उच्चशिक्षित प्रोफाइल आणि ग्लॅमरचे कनेक्शन

अटकेत असलेली आरोपी हर्षा सनी ही एका प्रतिष्ठित खासगी बँकेत ‘रिलेशनशिप मॅनेजर’ म्हणून कार्यरत आहे. याशिवाय ती ग्लॅमर जगताशी जोडलेली असून, तिने गेल्या वर्षी एका नामांकित सौंदर्य स्पर्धेत (Beauty Pageant) उपविजेतेपद (Runner-up) देखील पटकावले आहे.

Mumbai Crime News: प्रवाशाच्या संशयास्पद हालचालींवरून फुटले बिंग

हर्षा सनी ही गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास बँकॉकहून मुंबई विमानतळावर उतरली. कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना ‘प्रवासी प्रोफाइलिंग’ (Passenger Profiling) च्या आधारे तिच्यावर संशय आला. तिची वैयक्तिक झडती एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या तरतुदीनुसार एका राजपत्रित अधिकाऱ्याच्या (Gazetted Officer) उपस्थितीत घेण्यात आली, परंतु तिच्या अंगावर काहीही सापडले नाही. मात्र, त्यानंतर तिच्या सामानाची कसून झडती घेतली असता, एका ट्रॉली बॅगेमध्ये अत्यंत हुशारीने लपवून ठेवलेली १२ व्हॅक्यूम-सीलबंद (Vacuum-sealed) पाकिटे आढळून आली. ही पाकिटे उघडली असता त्यात हिरव्या रंगाचा उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक गांजा सापडला. ‘एनडीपीएस फील्ड टेस्टिंग किट’द्वारे तपासणी केली असता हा गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

Mumbai Crime News: “मित्राने फसवून बॅग दिली”; न्यायालयात दावा

कस्टम्स विभागाने हर्षा सनीला अटक करून एनडीपीएस न्यायालयात हजर केले, न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. तपास यंत्रणांनी न्यायालयाला सांगितले की, हा तपास प्राथमिक टप्प्यावर असून या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित इतर लोकांचा शोध घेतला जात आहे.

दुसरीकडे, हर्षाचे वकील प्रभाकर त्रिपाठी यांनी न्यायालयात दावा केला की, “माझी अशील या बॅगेतील साहित्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहे. संघटित अमली पदार्थ तस्करांकडून एका निष्पाप प्रवाशाची फसवणूक झाल्याचे हे एक स्पष्ट उदाहरण आहे. ही तरुण महिला बँकॉकला पर्यटनासाठी आणि नेल-आर्ट व मॉडेलिंग क्षेत्रात करिअरच्या संधी शोधण्यासाठी गेली होती. तिथे ओळख झालेल्या एका व्यक्तीने तिचा विश्वास संपादन केला आणि तिला ही बॅग भारतात नेण्यास दिली. बॅगेत काही बेकायदेशीर वस्तू आहे, याची तिला अजिबात कल्पना नव्हती.” या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेदेखील वाचा

Comments are closed.