टीएमसीच्या आणखी दोन खासदारांचे राजीनामे

चार दिवसांत चार राज्यसभा सदस्यांचा ममता बॅनर्जींना रामराम

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बाराईक आणि कोएल मल्लिक यांनी गुरुवारी राज्यसभेतून राजीनामा दिला. गेल्या चार दिवसांत 13 पैकी चार राज्यसभा खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. प्रकाश चिक बाराईक यांनी राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. या घडामोडींपूर्वी सुष्मिता देव यांनी 10 जून रोजी राजीनामा दिला होता. सुखेंदू शेखर यांनी 8 जून रोजी राज्यसभा सदस्यत्व आणि पक्ष सोडला होता.

तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड सुरू झाल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून पक्षात मोठे बदल झालेले दिसून येत आहेत. यापूर्वी, बंडखोर तृणमूल काँग्रेस खासदार काकोली घोष यांनी 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा केला होता. तसेच 80 पैकी 58 तृणमूल काँग्रेस आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कल्याण बॅनर्जीही नाराज

दरम्यान, ममता बॅनर्जी यांचे सर्वात जवळचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण बॅनर्जी यांच्या नाराजीचे कारण टीएमसीचे बनावट सह्यांचे प्रकरण आहे. ममता दीदींनी ठरवले पाहिजे की त्या माझ्यासोबत आहेत की अभिषेक बॅनर्जीसोबत. अभिषेकला ज्येष्ठ नेत्यांचा आदर कसा करावा हे माहीत नाही. तो खूप अहंकारी आहे. यामुळेच पक्षाची वाताहत झाली आहे. जर ममतादीदींना अभिषेकवर अवलंबून राहायचे असेल, तर त्यांनी त्याच्यासोबत राहावे आणि मला सोडावे. जर त्यांनी वेगळा मार्ग निवडला, तर मी ममता दीदींसोबत उभा राहीन, असे कल्याण बॅनर्जी म्हणाले.

Comments are closed.