संभाजीनगरमधील शिक्षकाच्या मृत्युचं गुढ कायम? पोलिसांकडून मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

संभाजीनगर : घरासमोर सुरू असलेला गोंधळ थांबवायला गेले पण त्याची किंमत जीव देऊन मोजावी लागली का? छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील वेरूळमध्ये शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की पोलीस आणि काही जणांच्या मारहाणीत बोरसे यांचा मृत्यू झाला. तर पोलिसांकडून या आरोपांबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापलं असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे बुधवारी रात्री घरी आलेल्या पाहुण्यांसाठी आईस्क्रीम आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, समोरील चौकात काही जण उभे होते. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर बोरसे यांनी ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली आणि याच ठिकाणी वादाला सुरुवात झाली.

कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यानंतर बोरसे यांना मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या बोरसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. तर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वेरूळ-संभाजीनगर मार्गावर रस्ता रोको आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा नोंद होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनानंतर, अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली.

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचं कारण समोर येईल

या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मात्र, मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की अन्य कारणामुळे, याबाबत पोलिसांकडून अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोस्टमॉर्टम अहवालातील निष्कर्ष आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी म्हटले.

दरम्यान, एका शिक्षकाचा मृत्यू, कुटुंबीयांकडून मारहाणीचा गंभीर आरोप, चार आरोपींना अटक आणि मृत्यूच्या कारणावरून कायम असलेलं गूढ. त्यामुळे, या प्रकरणात तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

धक्कादायक! पुण्यात आयटी इंजिनिअरने संपवलं जीवन;चिठ्ठीत कंपनीतील दोन महिलांचे नाव, हिंजवडी हादरली

Comments are closed.