दानवे यांना विधान परिषदेतून निरोप
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, पावसाळी अधिवेशनात आज त्यांना सभागृहात हृद्य निरोप देण्यात आला. यावेळी सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांच्यासह अनेक सदस्यांनी त्यांच्या राजकीय वाटचाल आणि संघर्षमय वाटचालीबद्दल त्यांचे कौतुक केले.
हा Comlicat मी पुन्हा येईन
मी कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे. शिवसेना पक्षप्रमुखांमुळे मला संधी मिळाली. गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचे काम करतोय. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी काम केले. माझ्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार महत्त्वाचा आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मी आक्रमक राहिलो पण आक्रस्ताळेपणा केला नाही, असे सांगताना हा पूर्णविराम नाही, तर केवळ अल्पविराम आहे. मी पुन्हा सभागृहात येईन, अशी भावना अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
कडवट हिंदुत्ववादी आणि कर्तबगार
एका एसटी चालकाचा मुलगा हा आपल्या कर्तृत्वाने एवढा मोठा झाला ही अभिमानस्पद गोष्ट आहे. संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणून अंबादास दानवे ओळखले जातात. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांविरोधात प्रचंड मोठे आंदोलन त्यांनी केले. आपला प्रश्न ठळकपणे सर्वांसमोर येईल अशा प्रकारची आंदोलने करण्याची त्यांची पद्धत आहे. विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा पह्डली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही
पदे येतात आणि जातात; मात्र लोकांच्या मनात आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आयुष्याचे फलित असते. अंबादास दानवे यांनी भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी धावून जाणारा, पद मागायला आणि ते टिकवायला कधीही माझ्याकडे आलेला नाही असा हा शिवसैनिक आहे. जनतेप्रति असलेले प्रेम आणि निष्ठा यामुळे अंबादाससारखे निःस्वार्थी कार्यकर्ते एक उंची प्राप्त करतात, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
कडवट शिवसैनिक कुशल विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी सभागृहात आणि गटनेत्याच्या बैठकीतही अत्यंत काटेकोरपणे काम केले. ते अत्यंत कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. विविध पदांची जबाबदारी त्यांनी कुशलतेने पार पाडलीच, पण विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. त्यामुळे सत्ताधारी पक्षांचे नेतेही तुमच्याबद्दल बोलले. म्हणून हा क्षण सर्वांच्या लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केली.
Comments are closed.