बेदम मारहाणीत शिक्षकाचा मृत्यू; आरोपी ‘नंबर एक’ला पोलीस भरवताहेत पेढा, फोटो शेअर करत अंबादास दानवेंचा इशारा

रात्रीच्या अंधारात घरात घुसून आरोपीला शोधणाऱ्या पोलिसांना जाब विचारण्याची जबर किंमत शिक्षकाला मोजावी लागली. ‘घरात कसे काय घुसता, तुम्ही साध्या वेशात आहात, पोलीस वाटत नाही, ओळखपत्र दाखवा’ असे विचारताच पोलिसांच्या अंगात हैवान संचारला! सोबत घेऊन आलेल्या वाळूमाफियाच्या मदतीने पोलिसांनी त्या शिक्षकाला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तुडवले आणि गाडीत बसवले. गंभीर अवस्थेत त्या शिक्षकाला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर या प्रकरणातील एका पोलीस अधिकाऱ्याचा आरोपीला पेढा भरवतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी पोलिसांना इशारा दिला आहे.

”वेरूळ शिक्षक प्रकरणाआ हा व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत. शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी ‘हा एक नंबर’ म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलीस अधिकारी याच ‘एक नंबर’ला पेढे भरवताना दिसत आहे. ​गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर आहेत (त्यात एक पोलिसही स्पष्ट दिसतो आहे), घटनेच्या वेळी ते पोलिसांसोबत हजर आहेत, त्यांचे रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे; असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी ‘अनोळखी’ कसे काय असू शकतात? हा गुन्हा नावानिशीच दाखल झाला पाहिजे. पोलिसांची ही उघडी दाबादबी आणि गुन्हेगारांचे चोचले आम्ही अजिबात सहन करणार नाही. तात्काळ कारवाई करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे”, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.

कौशिकी गल्लीत पोलिसांचा राडा

वैजापूर तालुक्यातील घोंदलगाव येथे संदीप माधव आवारे आणि रवींद्र रखमाजी आवारे यांच्यात संपत्तीवरून वाद आहे. या वादातून काही दिवसांपूर्वी रवींद्र आवारे यास जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली होती तर तिसरा आरोपी संदीप आवारे हा फरार होता. संदीप आवारे हा कौशिकी गल्लीत नातलगाकडे लपून बसल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी साध्या वेशात आलेले पोलीस मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका घरात घुसले. अनोळखी माणसे घुसल्याचे पाहून घरातील लोकांनी आरडाओरड केली. हे पाहून घराकडे निघालेले सुरेश बोरसे यांनी ‘तुम्ही कोण आहात’ अशी विचारणा केली.

घरात कसे काय घुसले, असे विचारताच हैवान जागा झाला; पोलीस, वाळूमाफियाच्या मारहाणीत शिक्षकाचा मृत्यू

पोलीस, वाळूमाफियाच्या मारहाणीत शिक्षकाचा मृत्यू

त्यावर ‘आम्ही पोलीस आहोत’ असे उर्मट उत्तर देण्यात आले. ‘साध्या वेशात आहात, खासगी गाडीने आलात, तुमच्या सोबत स्थानिक पोलीस नाहीत, तुम्ही नकली पोलीस तर नाही, तुमचे ओळखपत्र दाखवा,’ असे खडे बोल बोरसे यांनी सुनावले. त्यामुळे बिथरलेल्या पोलीस आणि बाळूमाफियांनी बोरसे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी बोरसे घराकडे पळाले. पण या टोळक्याने बोरसे यांना पकडून फरफटत आणले आणि गाडीत कोंबून लाथाबुक्क्यांनी तुडवले.

Comments are closed.