पुण्यात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली चालणारे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त! दररोज 400 जणांची फसवणूक
पुणे सायबर क्राइम प्रकरण: पुणे शहरात ऑनलाईन गेमिंग आणि सट्टा लावून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या हायटेक रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हडपसर (Hadapsar), फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरात पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून हे बनावट कॉल सेंटर (Fake Call Center) उद्ध्वस्त केले. या रॅकेटचे थेट ‘दुबई कनेक्शन’ (Dubai Connection) समोर आलं असून, पोलीस आता मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.
मुंढवा पोलीस आणि सायबर विभागाच्या (Cyber Crime Cell) संयुक्त पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून दररोज 300 ते 400 नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली जात होती.
Fake Call Center Modus Operandi : अशी व्हायची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील एका इमारतीमध्ये हे बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू होते. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना फोन करून ‘ऑनलाईन गेम’ खेळून घरबसल्या लाखो रुपये कमावता येतील, असे आमिष दाखवायचे.
विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला लोकांना गेम खेळून जिंकलेले काही पैसे दिले जायचे. मात्र, एकदा का संबंधित व्यक्ती मोठी रक्कम लावून गेम हरली की, कॉल सेंटरमधून पुन्हा फोन करून ‘पैसे जिंकण्याची आणखी एक सुवर्णसंधी आहे’ असं भासवलं जायचं. एकदा का ती व्यक्ती जाळ्यात अडकली की, त्याला विविध बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडून त्याची संपूर्ण फसवणूक केली जात असे.
अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीने त्याच्याकडे काम करणाऱ्या निष्पाप कर्मचाऱ्यांची शासकीय ओळखपत्रे गोळा केली होती. त्यांचा गैरवापर करून त्यांच्याच नावे शेकडो सिम कार्ड्स आणि बनावट बँक खाती (Mule Accounts) उघडण्यात आली होती, जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये.
Call Center Arrests and Seizures : दोन जणांना अटक
या रॅकेटची माहिती मिळताच पोलिसांनी गुप्त सापळा रचून या कॉल सेंटरवर छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. संतोष दत्ता वेंजणेकर आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के अशी अटक केलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत.
छापेमारी दरम्यान पोलिसांनी कॉल सेंटरमधून मोठ्या प्रमाणात तांत्रिक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये लॅपटॉप, हार्ड डिस्क, ऑटो डायलर मशीन (Auto Dialer), शेकडो सिम कार्ड्स, विविध कंपन्यांचे बनावट शिक्के, बँक पासबुक आणि चेक बुक्स जप्त करण्यात आली आहेत.
पुणे कॉल सेंटर दुबई कनेक्शन: मुख्य सुविधाकर्ता दुबईत सक्रिय
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या संपूर्ण आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य सूत्रधार हा दुबईत बसून या हालचाली नियंत्रित करत असल्याचे समोर आलं आहे. भारतातून जमा होणारा सर्व पैसा हवाला किंवा डिजिटल माध्यमातून हाताळण्यासाठी त्याचा एक खास सहकारी इतर आर्थिक व्यवहार पाहत होता. या दोघांचाही शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास मुंढवा पोलिस (Mundhwa Police Station) करत असून, नागरिकांनी अशा कोणत्याही ऑनलाईन गेमिंग आणि पैशांचे आमिष दाखवणाऱ्या फोन कॉल्सला बळी पडू नये, असे आवाहन पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने केले आहे.
ही बातमी वाचा:
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!
Comments are closed.