मुख्याध्यापकास शेअर मार्केटचा नाद, 1 कोटी 80 लाखांचं कर्ज; कुटुंबाला विष देऊन स्वत:लाही

सोलापूर क्राईम न्यूज : सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या बार्शी (Barshi) तालुक्यातील हत्तीज गावात एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या दोन मुलांसह पत्नीला विष देऊन स्वतःची जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेअर मार्केटमध्ये (Share Market) झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. योगेश पाटील (मुख्याध्यापक), माधुरी पाटील (पत्नी), अथर्व पाटील (मुलगा) आणि शिवांश पाटील (मुलगा) अशी मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.

Solapur Crime News: शेअर बाजारातील तोटा आणि 1 कोटी 80 लाखांचे कर्ज

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत योगेश पाटील हे नंदुरबार (Nandurbar) येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक (Principal) म्हणून कार्यरत होते. काही काळापासून ते शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करत होते. मात्र, शेअर मार्केटमध्ये त्यांना सातत्याने प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आणि बाजारात टिकून राहण्यासाठी त्यांनी विविध माध्यमांतून तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज (Loan) घेतले होते. कर्जाचा हा डोंगर आणि वसुलीसाठी होणारा मानसिक ताण यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड विवंचनेत होते.

Solapur Crime News: आधी कुटुंबाला संपवले, मग स्वतः उचलले टोकाचे पाऊल

याच आर्थिक मानसिकतेतून योगेश पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बार्शी तालुक्यातील आपल्या हत्तीज या मूळ गावी असताना, आधी आपली पत्नी माधुरी आणि दोन्ही पोटच्या मुलांना विष देऊन संपवले. त्यानंतर योगेश पाटील यांनी स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Solapur Crime News: घटनास्थळी पोलिसांना सापडली 22 पानांची चिठ्ठी

या घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. घटनेचा पंचनामा करत असताना पोलिसांना मृत मुख्याध्यापकाने लिहिलेली तब्बल 22 पानांची चिठ्ठी सापडली आहे. पोलीस या चिठ्ठीच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्यांवरून पुढील तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case: मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Beed Crime: पतीला चिकन राईस आणायला पाठवलं अन् प्रियकराला सांगून काढला काटा, नंतर ‘कार्यक्रम ओके’चा फोन; बीडमधील ‘त्या’ प्रकरणात धक्कादायक खुलासा

Comments are closed.