मुंबई विमानतळावर उद्या शिवसेनेचा एल्गार, संजय राऊत यांचा इशारा

मुंबई विमानतळ ताब्यात घेऊन ते गुंडांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिथे सोनं तस्करीसारखे गैरप्रकार घडत असून, याविरोधात आवाज उठवणाऱ्या शिवसेनेला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अन्यायाविरोधात उद्या 15 जून रोजी दुपारी ठीक 2 वाजता आम्ही सर्वजण मुंबई विमानतळावर एकत्र येत मेळावा घेत आहोत, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

शिवसेना खासदारांच्या आज होत असलेल्या महत्त्वाच्या बैठकीवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला संजय राऊतांनी चोख उत्तर दिले. “शिवसेनेला स्थापन होऊन 60 वर्षे झाली आहेत. या 60 वर्षांत खासदारांची ही काय पहिलीच बैठक आहे का? ‘ऑपरेशन टायगर’ला घाबरून ही बैठक बोलावली आहे, असे म्हणणारे निव्वळ मूर्ख आहेत. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपल्या खासदारांची बैठक बोलावायची नाही का? यांना कोण घाबरतंय.

अमित शाह सत्तेवरून पायउतार झाल्यावर घरातून निघणे मुश्कील होईल!

संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्ही ऑपरेशन लांडगा करणार आहोत. सगळे लांडगे तिकडे गेलेत. कशाला वाघाचा अपमान करता. खरतर सध्या हे लोक पोलीस आणि पैशांच्या ताकदीवर आमच्याशी लढत आहेत. यांच्यात जराही हिंमत असेल तर त्यांनी गौतम अदानी यांच्यासमोर उभे राहून दाखवावे. आमची हिंमत आहे, कारण आम्ही ‘खरे टायगर’ आहोत. अमित शाह ज्या दिवशी सत्तेवर नसतील, त्या दिवशी या लोकांना घरातून बाहेर पडणेही मुश्कील होईल,” असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. या पळपुट्या, डरपोक आणि भ्रष्ट लोकांना जनतेने फार महत्त्व देऊ नये, यात महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे मोठे नुकसान असल्याचे संजय राऊत यांनी नमूद केले.

आज होत असलेल्या या बैठकीला सर्व खासदार उपस्थित राहणार असून, जे प्रत्यक्ष येऊ शकणार नाहीत, ते ‘व्हर्च्युअली’ (ऑनलाईन) उपस्थित राहून आपला पाठिंबा नोंदवणार असल्याची माहितीही राऊत यांनी शेवटी दिली.

दादरच्या फुटपाथवरील पांढऱ्या पट्ट्यांवरून सध्या वाद सुरू आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपच्या प्रमुखांना या विषयावर बोलावं. आम्ही ठेका घेतलाय का? पण मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबईवर मराठी संस्कृतीचा पगडा राहील त्यासाठी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पावर) हे सतत संघर्ष करत राहू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Comments are closed.