IND vs PAK: हरमनप्रीत कौरचा रोहित शर्माला मागे टाकत नवा विक्रम! सर्वाधिक टी-20 वर्ल्ड कप खेळणारी भारतीय खेळाडू

आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 World Cup 2026) मध्ये भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने केली आहे. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मैदानात उतरताच हरमनप्रीत कौरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला असून, सर्वाधिक टी-20 विश्वचषक खेळणारी ती भारताची अव्वल खेळाडू ठरली आहे.

हरमनप्रीत टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या पर्वापासून सहभागी होत असून, हा तिचा 10 वा विश्वचषक आहे. याआधी सर्वाधिक 9 वेळा टी-20 विश्वचषक खेळण्याचा विक्रम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर होता, ज्याची बरोबरी हरमनप्रीतने केली होती; मात्र आता त्याला मागे टाकत ती या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. रोहित शर्माने 2007 च्या पहिल्या टी-20 विश्वचषकापासून 2024 पर्यंत एकूण 9 विश्वचषक खेळले होते आणि त्यानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

2022 नंतर इंग्लंडमध्ये टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे, या सामन्यासह भारताचा सलग 8 वेळा नाणेफेक हरण्याचा सिलसिला थांबला आहे. हरमनप्रीतने या सामन्यासह टी-20 विश्वचषकात एकूण 40 सामने खेळले आहेत. तिने सोफी डिवाइनला मागे टाकत या यादीत चौथा क्रमांक मिळवला असून, 48 सामन्यांसह ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी पहिल्या क्रमांकावर आहे.

Comments are closed.