Pregnancy Yoga : प्रेग्नेंट महिलेची योग करतानाची पोस्ट व्हायरल पण प्रत्येकासाठी सुरक्षित आहे का?

गर्भावस्थेच्या अखेरच्या टप्प्यात साडी नेसून अवघड योगासनं करणाऱ्या एका योग शिक्षिकेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. काहींनी तिच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले तर काहींनी यामध्ये धोका असल्याचे मत व्यक्त केले. या चर्चेमुळे अनेक गर्भवती महिलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की गर्भधारणेच्या वेळी योग करणे खरोखर सुरक्षित असते का?

व्हायरल फोटोंची चर्चा
बंगळुरूमधील योग शिक्षिका शशी प्रभा द्विवेदी यांनी गर्भावस्थेच्या 39 व्या आठवड्यात विविध योगमुद्रा केल्याचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. त्यांचा अनेक वर्षांचा योगाचा अनुभव असल्याने त्यांनी केलेल्या आसनांकडे लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. मात्र तज्ज्ञांचे मत आहे की प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती वेगळी असते आणि एका व्यक्तीसाठी सुरक्षित असलेली गोष्ट दुसऱ्यासाठी योग्य असेलच असे नाही.

तज्ज्ञांच्या मते गर्भावस्थेत योग करावा की नाही याचा निर्णय महिलेच्या आरोग्यस्थितीवर आणि गर्भधारणेतील गुंतागुंतीवर अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे दुसऱ्या तिमाहीनंतर हलक्या स्वरूपातील प्रीनेटल योगाची शिफारस केली जाते. मात्र कोणतेही आसन सुरू करण्यापूर्वी डॉक्टर आणि प्रशिक्षित योगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

अखेरच्या आठवड्यांत कोणता योग फायदेशीर
गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात काही सौम्य स्ट्रेचिंग व्यायाम आणि प्राणायाम फायदेशीर मानले जातात. यामुळे पाठदुखी कमी होण्यास मदत होते तसेच मानसिक ताणही कमी होतो. काही योगप्रकार पेल्विक स्नायूंना बळकट करून प्रसूतीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यास मदत करू शकतात. मात्र अवघड आणि शरीरावर जास्त ताण देणारी आसने टाळणे गरजेचे असते.

तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा
जगभरातील अनेक अभ्यासांमध्ये प्रीनेटल योग सुरक्षित असल्याचे आढळले आहे. तरीही प्रत्येक गर्भवती महिलेने सोशल मीडियावर दिसणाऱ्या उदाहरणांचे अनुकरण न करता स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे.

Comments are closed.