मोरोक्कोची सिंहगर्जना, ब्राझिलला रोखत वर्ल्ड कपमध्ये पहिला मोठा धक्का

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फुटबॉलमध्ये नाव मोठं असलं तरी विजयाची हमी नसते. हे वर्ल्ड कपच्या पहिल्याच फेरीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. पाच वेळचा विश्वविजेता ब्राझिल, लाखो चाहत्यांचा लाडका, स्पर्धेचा प्रमुख दावेदार आणि सांबा फुटबॉलचा बादशाह… पण मोरोक्कोच्या अ‍ॅटलस लायन्ससमोर त्याचा डंका फारसा वाजला नाही. जगातील सातव्या क्रमांकाच्या मोरोक्कोने ब्राझिलला 1-1 अशा बरोबरीत रोखत वर्ल्ड कपमध्ये पहिला मोठा धक्का दिला. ब्राझिलने सलामीच्या सामन्यांतील 1934 पासूनची अपराजित परंपरा कायम राहिली खरी, पण ती विजयाने नाही तर कसाबसा वाचलेल्या बरोबरीने. आजची बरोबरी ब्राझिलसाठी पराभव आणि मोरोक्कोसाठी विजयासमान होती.

मोरोक्कोची पहिली डरकाळी

सामन्याच्या सुरुवातीपासूनच मोरोक्कोने ब्राझिलला दाखवून दिलं की, ते इथे केवळ सहभागी होण्यासाठी आलेले नाहीत. अक्राफ हकिमी आणि ब्राहिम डायझ यांनी उजव्या बाजूने अशी आक्रमणांची बरसात केली की ब्राझिलच्या बचावफळीला अक्षरशः घाम फुटला. 21 व्या मिनिटाला डायझने दिलेल्या अचूक पासवर इस्माईल सैबारी विजेच्या वेगाने पुढे सरसावला. समोर उभा होता जगातील अव्वल गोलरक्षकांपैकी एक ऑलिसन बेकर. पण सैबारीने त्याच्यावरून चेंडू अलगद उंचावत जाळ्यात धाडला आणि मोरोक्कोच्या चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतलं.

ब्राझिल पिछाडीवर होता आणि वर्ल्ड कपमधील पहिला मोठा धक्का आकार घेत होता. मग मैदानात आला विनिसियस. महान संघांची खरी ओळख संकटात होते. विश्रांतीनंतर ब्राझिलचा तारणहार ठरला विनिसियस ज्युनियर. ब्रुनो गिमाराएससोबतच्या अप्रतिम वन-टू खेळीनंतर त्याने मारलेला वळणदार फटका थेट जाळ्यात विसावला. मोरोक्कोचा गोलरक्षक यासीन बुनूही क्षणभर स्तब्ध झाला. सामना 1-1 झाला आणि ब्राझिलच्या चाहत्यांच्या छातीत पुन्हा आशेचा दिवा पेटला. मात्र तो दिवा विजयाच्या मशालीत रूपांतरित होऊ शकला नाही.

बुनू भिंतीसारखा उभा राहिला

विनिसियसच्या गोलनंतर ब्राझिलने आक्रमणांची मालिकाच सुरू केली. लुकास पाक्वेटाचा स्फोटक व्हॉली गोलकडे झेपावला होता. पण समोर उभा होता बुनू. त्याने चित्तथरारक बचाव करत मोरोक्कोची आशा जिवंत ठेवली. दुसऱ्या सत्रात मोरोक्कोने बचावात्मक रणनीती स्वीकारली. त्यांनी ब्राझिलला पुढे खेचलं आणि प्रतिआक्रमणांचे सापळे रचले.

Comments are closed.