टीएमसीच्या बंडखोर गटात 22 खासदार
काकोली घोष यांचा दावा : आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये पडझड सुरू असतानाच आता पक्षत्याग करून बंडखोर गटात सामील झालेल्या खासदारांची संख्या 22 पर्यंत वाढल्याचा दावा ज्येष्ठ नेत्या काकोली घोष यांनी केला आहे. 20 हून अधिक टीएमसी खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. हे खासदार आता एक वेगळा गट स्थापन करू इच्छित आहेत आणि एनडीएला पाठिंबा देण्याबद्दल बोलत आहेत. सोमवारी हा गट लोकसभा अध्यक्षांना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून पक्षातील तणाव वाढत आहे. या बंडखोर गटाच्या नेत्या बनलेल्या टीएमसी खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना आता त्यांच्यासोबत 22 खासदार असल्याची माहिती दिली. यापूर्वी त्यांनी 20 खासदार असल्याचा दावा केला होता. दोन नवीन खासदार सामील झाले आहेत, परंतु त्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. ते औपचारिकपणे आमच्यात सामील झाल्यानंतरच नावे जाहीर केली जातील, असे त्या म्हणाल्या. बंडखोर नेतेमंडळी आपल्याला एक वेगळा संसदीय गट म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी लोकसभा अध्यक्षांकडे करणार आहे. म्हणजेच त्यांना टीएमसीपासून वेगळा एक नवीन संसदीय गट स्थापन करायचा आहे. काकोली यांनी स्वत: कोलकाता विमानतळावर माध्यमांना हे विधान केले. या बंडखोर गटाने केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला पाठिंबा देणार असल्याचेही म्हटले आहे. याचा अर्थ हा केवळ पक्षापासून दुरावा नसून थेट विरोधी गोटात जाण्याचे पाऊल आहे. बंडखोर खासदारांची बैठक सुरुवातीला कोलकाता येथे होणार होती, परंतु आता ती दिल्लीत हलवण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती, परंतु शासकीय कामामुळे ते उपस्थित राहू शकणार नसल्याचे समजते.
Comments are closed.