‘मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय’; मित्रपक्षांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या

हर्षवर्धन सपकाळ : विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळीत आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. अमरावती विधान परिषदेच्या जागेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी एक मोठा दावा केला आहे. “भाजपने अमरावतीत दिलेल्या उमेदवारावरून भाजपमध्येच प्रचंड नाराजी असून, यामुळे भाजपची मते फुटू शकतात,” असा दावा त्यांनी केला आहे. मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय असल्याचे वक्तव्य देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

विधान परिषद निवडणूक 2026: 'पैशाचा खोटा तमाशा बघा'; सपकाळांचा गंभीर आरोप

राज्यात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांची पीछेहाट होताना पाहायला मिळत आहे, या प्रश्नावर उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ आक्रमक झाले. ते म्हणाले, “पैसा फेक तमाशा देख, या धर्तीवर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या. या निवडणुकीमध्ये विरोधकांचे उमेदवारी अर्ज तांत्रिक दबावापोटी त्यांनी बाद करून घेतले. कॉलर पकडून आणून उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावले आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांना पैसा दिला. त्यातून हा मतदार पुढे येत असताना मतदारांची संख्या कमी आहे. साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करत असताना सत्ताधारी या निवडणुकीत थैमान घालत आहेत,” असा आरोप त्यांनी केलाय.

Harshvardhan Sapkal: प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण?

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या मार्गावर असून त्यांचे विलिनीकरण होणार, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर भाष्य करताना सपकाळ म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशात एकच पर्याय आहे, तो म्हणजे काँग्रेस. मोदींना थांबवायचे असेल तर एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे राहुल गांधी. भाजप आणि काँग्रेस असे दोनच प्रवाह हे ‘जर-तर’च्या स्वरूपात देशात निर्माण झाले आहेत. या परिस्थितीच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांच्या संदर्भात अशा चर्चा सुरू आहेत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Harshvardhan Sapkal: काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी केवळ ‘वावड्या’

काँग्रेसचे काही नेते तुमच्या भूमिकेवर नाराज होते आणि त्यांनी वरिष्ठांकडे (High Command) तक्रार केली, या चर्चेचा हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. “कोणी दिल्लीला गेले किंवा वरिष्ठांकडे तक्रार केली असे कोठे ऐकण्यात आलेले नाही. अशा वावड्या उडवल्या जातात. कदाचित या वावड्या उठवण्यामागे भारतीय जनता पक्षाचा (BJP) हात असेल. काँग्रेसने जी आंदोलने केली त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आणि आम्ही सरकारला धारेवर धरले, त्याचा परिणाम म्हणून या वावड्या उठवण्याची सुरुवात केली असावी,” असा टोला त्यांनी लगावला.

आणखी वाचा

Amravati Vidhan Parishad Election 2026: अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना ‘मिरगी’ आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले…

Comments are closed.