Ratnagiri News – अन्न व औषध प्रशासनाची राज्यात धडक कारवाई पण रत्नागिरीत अधिकाऱ्यांची वानवा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी संपूर्ण राज्यात धडक कारवाई सुरू केली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने कारवाई संथगतीने सुरू आहे. रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात अन्न विभागात सहाय्यक आयुक्ताचे पद रिकामे आहे, तर औषध विभागातील औषध निरीक्षकाची दोन्ही पदे रिक्त आहेत. दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून गुटखा पकडला आहे. 60 हॉटेल्सवर धाड टाकून अनपेक्षित तपासणी केल्यानंतर तिघांवर कारवाई करत 24 हजाराचा दंड वसूल केला आहे. चार हॉटेल व्यवसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत एकूण 6 लाख 7 हजार 135 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित सर्व प्रकरणांमध्ये स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे (FIR) नोंदवण्यात आले आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातील ही जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) मि. र. महांगडे यांनी दिली आहे.

​जिल्ह्यात अन्न सुरक्षा दर्जेदार राहावी यासाठी प्रशासनाने एकूण 60 अन्न आस्थापनांची कसून तपासणी केली आहे. यामध्ये दापोली तालुक्यातील 10 आस्थापनांचा समावेश असून, प्रामुख्याने बेकरी, हॉटेल्स आणि स्वीट मार्ट्सची तपासणी करण्यात आली. दापोली तालुक्यातून प्राप्त झालेल्या विविध तक्रारींच्या अनुषंगाने हे विशेष कामकाज हाती घेण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील काळातही ही तपासणी सत्र आणि विश्लेषणासाठी अन्न नमुने घेण्याची कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील ‘मे. श्री स्टोअर्स’ आणि केळसकर नाका येथील ‘अश्पाक महमुद मनियार’ यांच्या पान शॉपवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला केसरयुक्त विमल पान मसाला, आरएमडी पान मसाला व इतर आरोग्यास घातक असलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

​अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे सध्या केवळ चार अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. त्यातही खेड, दापोली आणि मंडणगड या विस्तीर्ण व संवेदनशील क्षेत्रासाठी केवळ एकाच अधिकाऱ्यावर जबाबदारी आहे. मात्र, अशा मर्यादित मनुष्यबळाचा सामना करत असतानाही विभागाने जिल्ह्यात ही धडक आणि प्रभावी कामगिरी बजावली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अन्न आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.