IND A Vs SL A – वैभव सूर्यवंशीवर ICC ची दंडात्मक कारवाई, सामना शुल्कात 50 टक्के कपात; कारण काय?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थान ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील 15 जून रोजी सामना संपल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये जोरदार तणाव निर्माण झाला होता. सामन्यात विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी अत्यंत आक्रमक पद्धतीने जल्लोष साजरा केला. या जल्लोषादरम्यान श्रीलंकेच्या विशेन हलमबागे याने वैभववर काही वैयक्तिक टिप्पणी केली, ज्यामुळे वैभवचा संयम सुटला. संतापलेल्या वैभवने प्रतिस्पर्धी खेळाडूजवळ जात त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि या वादाचे रूपांतर पुढे दोन्ही खेळाडूंमधील धक्काबुक्कीत झाले. मॅच रेफरींनी या शिस्तभंगाची गंभीर दखल घेत वैभव सूर्यवंशी आणि विशेन हलमबागे या दोघांनाही दोषी धरले आहे. शिक्षा म्हणून या दोन्ही खेळाडूंच्या सामना शुल्कात 50 टक्के कपात करण्यात आली आहे.

IPL 2026 गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला या तिरंगी मालिकेत अद्याप आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. आज (17 जून 2026) झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 28 चेंडूंत 38 धावा केल्या खऱ्या, परंतु मिळालेल्या दोन जीवदानाचा मोठा स्कोअर करण्यासाठी त्याला फायदा उठवता आला नाही. वैभवच्या खराब फॉर्मचा संघाच्या कामगिरीवर मात्र कोणताही परिणाम झाला नाही. हिंदुस्थानने अफगाणिस्तान ‘अ’ संघाचा 101 धावांनी मोठा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि अंतिम फेरीत धडक मारली.

हिंदुस्थानाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 7 बाद 319 धावांचा डोंगर उभा केला होता. यात प्रियांश आर्या (58), तिलक वर्मा (59) आणि कुमार कुशाग्र (58) यांनी उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली, तर विपरज निगम आणि ऋतुराज गायकवाड यांनी प्रत्येकी 30 धावांचे योगदान दिले. 320 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव 218 धावांवरच आटोपला. हिंदुस्थानाकडून निशांत सिंधूने सर्वाधिक 4 विकेट्स घेतले, तर यश ठाकूरला 2 विकेट्स मिळाल्या. विपरज निगम, सूर्यांश शेडगे आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद करत हिंदुस्थानाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Comments are closed.