फिफावर चढली एम.एस. धोनीची जादू? मेस्सीच्या हॅटट्रिकनंतर केली अशी पोस्ट, पाहून सीएसकेही आश्चर्यचकित!
फिफा विश्वचषक स्पर्धेचा 23 वा हंगाम सध्या सुरू आहे. अर्जेंटिनाने आज झालेल्या त्यांच्या पहिल्या सामन्यात अल्जेरियाचा 3-0 असा धुव्वा उडवला. या तिन्ही गोलची हॅटट्रिक लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) केली. फुटबॉल विश्वचषकातील ही मेस्सीची पहिलीच हॅटट्रिक ठरली आहे. या कामगिरीनंतर मेस्सी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, फिफानेही त्याच्याबद्दल अनेक पोस्ट केल्या आहेत. मात्र, फिफाच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, जी भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीशी (M.S Dhoni) जोडली जात आहे आणि यामुळे खुद्द चेन्नई सुपर किंग्स (CSK) देखील आश्चर्यचकित झाली आहे.
फिफाने लिओनेल मेस्सीचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये “ग्रेटनेस” (महानता) असे लिहिले. या फोटोमध्ये मेस्सीच्या वर ‘थाला’ (THALA) असे लिहिलेले होते. ‘थाला’ या नावानेच एम.एस. धोनी ओळखला जातो. हा मूळचा तमिळ शब्द असून त्याचा अर्थ ‘नेता’ किंवा ‘बॉस’ असा होतो. जेव्हा जेव्हा ‘थाला’ असा उल्लेख होतो, तेव्हा सर्वांच्या डोळ्यासमोर धोनीचाच चेहरा येतो. त्यामुळे फिफाच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत की, “फिफावरही धोनीची जादू चालली आहे,” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “थाला सर्वत्र आहे.”
फिफाच्या या पोस्टवर चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरूनही कमेंट करण्यात आली. सीएसकेने आश्चर्याचे (Surprise) दर्शवणारे ‘इमोजी’ पोस्ट केले. विशेष म्हणजे, या 3 गोलसह लिओनेल मेस्सी फिफा विश्वचषकाच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. विश्वचषकातील हा त्याचा एकूण 16 वे गोल होता. दुसरीकडे, एम.एस. धोनीबद्दल बोलायचे झाले तर, तो भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 आणि वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. तसेच 2013 मध्ये भारताने त्याच्याच नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. तसेच, आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 5 वेळा जेतेपद पटकावले आहे.
Comments are closed.