रोनाल्डोच्या पोर्तुगालला धक्का देणारा योआन विसा नक्की कोण? एकेकाळी दृष्टी जाण्याची भीती, आता फिफा विश्वचषकात डीआर कॉंगोसाठी केला ऐतिहासिक गोल
फिफा विश्वचषक 2026 मध्ये बुधवारी (17 जून) ग्रुप के मधील एक रोमांचक सामना खेळला गेला. ह्युस्टन स्टेडियमवर पोर्तुगाल विरुद्ध डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो (डीआर कॉंगो) सामना खेळला गेला. हा सामना सुरू होण्याआधी, पोर्तुगाल हा सामना सहज जिंकेल, अशी अपेक्षा होती. झाले भलतेच, हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. त्यामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि पोर्तुगालचे चाहते चांगलेच निराश झाले. या सामन्यात त्यांची कामगिरी खूपच खराब झाली, तसेच सामना बरोबरीत राहिल्याने त्यांची आणखी निराशा झाली.
या सामन्यात कॉंगोकडून योआन विसाने ऐतिहासिक गोल केला. कॉंगोचा हा विश्वचषकातील पहिलाच गोल ठरला. न्यूकॅसल युनायटेडच्या या २९ वर्षीय फॉरवर्डने पहिल्या हाफच्या स्टॉपेज टाइमच्या पाचव्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरचा पुरेपूर फायदा उचलला, त्याने उत्तम हेडरद्वारे गोल केला आणि 52 वर्षांनंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या डीआर कॉंगोने इतिहास रचला.
पोर्तुगालचा मिडफिल्डर जाओ नेव्हेसने सहाव्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती, मात्र विसाने केलेल्या गोलने सामना बरोबरी आला. नंतर कोणालाही गोल करता आला नसल्याने सामना बरोबरीतच संपला. दुसरीकडे विसा अचानक चर्चेचा विषय बनला. पाच वर्षांपूर्वी त्याने याची क्ल्पनाही केली नसेल. तो नक्की कोण, त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ.
झाले असे की, 1 जुलै 2021 मध्ये विसाने एका महिलेसाी आपल्या घराचा दरवाजा उघडला, जिने त्याच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकले. या घटनेत विसा खूपच गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याची दृष्टी जाऊ शकली असती. त्याचे करिअरही संपुष्टात येऊ शकले असते. पुढे त्या हल्लेखोराला जानेवारी 2025 मध्ये 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
विसाचा जन्म 3 सप्टेंबर 1996 रोजी फ्रान्समधील विलन्यूव्ह सेंट जॉर्जेस येथे झाला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरूवात तेथूनच केली. नंतर त्याने ब्रेंटफोर्ड संघासोबत प्रीमियर लीगमध्ये प्रगती केली. त्याचा वेग, चपळाई आणि अचूक गोल करण्याची क्षमता यामुळे लवकरच सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे न्यूकॅसल युनायटेडने गेल्या वर्षी त्याला करारबद्ध केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान झालेल्या दुखापतींमुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, आता त्याने फिफा विश्वचषक स्पर्धेत काँगोसाठी गोल करून सर्वांना चकित केले आहे.
कॉंगोने 1974 मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता, पण त्यांना एकही गोल करता आला नव्हता. आता, 52 वर्षांनंतर, हा संघ फिफामध्ये परतला आहे. विसाने अगदी पहिल्याच सामन्यात गोल करून इतिहासात आपले नाव कोरले आहे. सामना बरोबरीत राहिल्याने या स्पर्धेच्या इतिहासातील त्यांचा हा पहिला गुणही ठरला आहे.
Comments are closed.