वसई महापालिकेच्या रुग्णालयात नायजेरियन नागरिकाचा मृतदेह कुजला, प्रशासन म्हणते उंदीर मेला
नायजेरियन नागरिकाचा मृतदेह कुजल्याने वसई पालिकेच्या रुग्णालयात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी आवाज उठवल्यावर रुग्णालय प्रशासनाने उंदीर मेल्याची थाप मारून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जागरूक नागरिकांनी याची पोलखोल केल्यानंतर हादरलेल्या रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आणि रात्री उशिरा हा मृतदेह रुग्णालयातून नेण्यात आला.
नालासोपारा पूर्व विजयनगर येथील वसई-विरार शहर पालिकेचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात चार दिवसांपूर्वी एका नायजेरियन नागरिकाचा मृत्यू झाला होता. मात्र कुणीही जवळचे नातेवाईक न आल्याने हा मृतदेह शीतगृहात ठेवणे गरजेचे असताना एका रूममध्ये उघड्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे पालिका रुग्णालय परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. अन्य रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनाही मास्क लावून काम करण्याची वेळी आली. विशेष म्हणजे दुर्गंधीने संपूर्ण रुग्णालय घुसमटले असताना अधिकारी उंदीर मेल्यामुळे दुर्गंधी येत असल्याचे सांगून आपले पाप दडवत होते. अखेर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी आवाज उठवल्यानंतर वेळकाढूपणा करणाऱ्या पोलिसांनी हा मृतदेह रुग्णालयातून नेला.
Comments are closed.